भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुलीच्या कारकिर्दीचा शेवट खूपच निराशाजनक राहिला. जेव्हा भारतीय संघ मॅच फिक्सिंगमुळे अडचणीत होता, तेव्हा गांगुलीनेच भारताला त्यातून वर काढले आणि या कर्णधाराचा शेवट असा निराशाजनक झाल्यामुळेच कदाचित क्रिकेटचे अस्तित्त्व असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी गांगुलीच्या कर्णधारपद सोडण्यामागे केवळ भारताचे सर्वात वादग्रस्त प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा हात असल्याचे म्हटले जाऊ लागले होते. परंतु आता स्वत: गांगुलीनेच या गोष्टींना दुजोरा देत म्हटले आहे, केवळ एकटा प्रशिक्षक असे करू शकत नव्हता, अनेक लोकांचा समावेश होता.
“चूकीचे घडले माझ्यासोबत”
‘दादा’ या नावाने ओळखला जाणाऱ्या गांगुलीकडे (Sourav Ganguly) २००० साली अशा काळात भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते, जेव्हा भारतीय संघ अतिशय वाईट काळातून जात होता. परंतु गांगुलीने आपल्या अप्रतिम नेतृत्वाने पुन्हा एकदा भारतीय संघाला आपल्या पायावर उभे केले आणि केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जिंकायचे कसे हे शिकविले. परंंतु जेव्हा २००३ मध्ये चॅपेल (Greg Chappell) यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मिळाली, तेव्हा त्यांनी गांगुलीला कर्णधारपदावरून काढण्याबरोबरच संघातूनही वगळले. आता गांगुलीने बंगाली वृत्तपत्र संगबान प्रतिदिनशी चर्चा करताना आपल्या भावना शेअर केल्या.
तो म्हणाला, “हा माझ्या कारकिर्दीला बसलेला सर्वात मोठा फटका होता. माझ्यावर अन्याय झाला होता. मला माहीत आहे की तुम्हाला प्रत्येक वेळी न्याय मिळू शकत नाही. परंतु जी पद्धत वापरण्यात आली, त्यापासून तरी वाचता आले असते. मी त्या संघाचा कर्णधार होतो, ज्याने नुकतेच झिंबाब्वेमध्ये विजयी पताका फडकवली होती. आणि मायदेशात परतल्यानंतर मला कर्णधारपदावरून वगळण्यात आले?”
“मी भारतासाठी २००७ चा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. आम्ही मागील वेळी अंतिम सामन्यात पराभूत झालो होतो. माझ्याकडे स्वप्नं पाहण्याची कारणंही होती. संघाने मागील ५ वर्षांमध्ये माझ्या नेतृत्वात मायदेशात असो वा परदेशात दोन्हीकडे चांगली कामगिरी केली होती. मग अचानक तुम्ही मला ड्रॉप करता? आधी तुम्ही म्हणता की मी वनडे संघात नाही, त्यानंतर तुम्ही मला कसोटी संघातूनही वगळता,” असेही आपल्या स्वप्नाबद्दल बोलताना गांगुली म्हणाला.
“केवळ चॅपेल यांना दोष द्यायचा नाहीये”
गांगुली आणि चॅपेल यांच्यात वाद होते. चांगले नेतृत्व करणाऱ्या गांगुलीला अचानकपणे कर्णधारपदावरून वगळणे, कोणाच्याही घशाखाली उतरले नाही. चॅपेलच्या प्रशिक्षण दौऱ्याला सर्व खेळाडूंनी भारतीय क्रिकेटचा सर्वात वाईट दिवस सांगितले आहे.
तो म्हणाला, “मला केवळ एकट्या चॅपेल यांना दोष द्यायचा नाही. याबाबतीत कोणतीही शंका नाही की हे सर्व चॅपेल यांनी सुरु केले होते. ते अचानक माझ्याविरुद्ध बोर्डाला ई-मेल पाठवतात, जो लिक होतो. असे काही असते का? एक क्रिकेट संघ एका कुटुंबाप्रमाणे असते. कुटुंबात मतभेद, गैरसमज होऊ शकतात. परंतु चर्चा करून याचे निरसन केले पाहिजे. तुम्ही प्रशिक्षक आहात, जर तुम्हाला वाटते की मला एका निश्चित पद्धतीने खेळले पाहिजे, तर मला येऊन सांगा. जेव्हा मी एक खेळाडूच्या रूपात परतलो, तेव्हा त्यांनी मला त्याच गोष्टी सांगितल्या. मग याच गोष्टी आधी का सांगता येऊ शकत नव्हत्या?”
इतर लोकही नव्हते निर्दोष
आजपर्यंत प्रत्येकजण गांगुलीची कारकिर्दीच्या वाईट शेवटासाठी जबाबदार मानले जात होते. परंतु आता गांगुलीनेच खुलासा केला आहे, की केवळ एक परदेशी प्रशिक्षक एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही.
“इतरही निर्दोष नाहीत. एक परदेशी प्रशिक्षक भारतीय कर्णधाराला त्याच्या कर्णधारपदावरून एकटा वगळू शकत नाही. मला हे समजले होते, की हे संपूर्ण व्यवस्थापनाच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. प्रत्येकजण मला वगळण्याच्या योजनेत सामील होते. परंतु मी दबावात नव्हतो. मी स्वत: वरील विश्वास गमावला नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटी मालिका सुरु असतानाच इंग्लंडने वनडेसाठी जाहीर केला संघ, पहा कुणा कुणाला मिळाली संधी
-ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम
-मुंबई इंडियन्सचा माजी शिलेदार म्हणतोय, आयपीएल तर झालीच पाहिजे