भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशरफ यांना यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीबद्दल 2006 च्या दौऱ्यावेळी एक मजेशीर उत्तर दिले होते. त्याबद्दल गांगुलीने एक खुलासा केला आहे.
गांगुलीने सांगितले की “मला अजून आठवते की परवेझ मुशरफ यांनी मला धोनी कुठे भेटला, असे विचारले होते.”
‘तेव्हा मी त्यांना गमतीने म्हणालो, तो(धोनी) वाघा बॉर्डरच्या शेजारुन जात होता आणि आम्ही त्याला आत ओढून आणले.’
या 2006 च्या पाकिस्तान दौऱ्यात धोनीने 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3 अर्धशतकांसह 4 डावांमध्ये 219 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर गांगुलीने धोनीला चॅम्पियन खेळाडू आहे असे म्हणताना तो अजूनही संघात स्थान मिळवण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.
याबद्दल गांगुली म्हणाला, ‘तो चॅम्पियन आहे. त्याची 2007 चा टी20 विश्वचषक जिंकल्यापासून 12-13 वर्षाची अफलातून कारकिर्द आहे. बाकीच्यांप्रमाणेच त्यालाही चांगली कामगिरी करावी लागेल.’
‘आयुष्यात एक गोष्ट आवश्यक आहे: तूम्ही जे काही काम करत आहात, तूम्ही जे काही आहात, तूमचे जे काही वय आहे, तूम्हाला किती अनुभव आहे, यापेक्षा तूम्हाला नेहमी अव्वल दर्जाची कामगिरी करावी लागेल. नाहीतर कोणीतरी येऊन तुमची जागा घेईल.
‘मी धोनीला शुभेच्छा देतो, कारण आम्हाला तो जेव्हाही खेळेल तेव्हा चॅम्पियनसारखा हवा आहे. मला वाटते की तो स्टँडमध्ये चेंडू फटकवण्यासाठी अजूनही सक्षम आहे. तो अभूतपूर्व क्रिकेटपटू आहे.’
त्याचबरोबर 2019 च्या भारतीय संघाविषयी गांगुली म्हणाला, ‘मी निवड समितीसदस्य नाही. पण माझ्या अपेक्षेनुसार सध्याच्या भारतीय संघापैकी 85-90 टक्के संघ विश्वचषक खेळेल.’
महत्त्वाच्या बातम्या:
–सध्या टीकेचा सामना करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा आयसीसीकडून मोठा सन्मान
–कारकिर्दीच्या शिखरावर असताना मलाही मिताली राज प्रमाणे संघातून वगळले- गांगुली
–क्रिकेटमध्ये मिशेल स्टार्क आणि एलिसा हेली जोडप्याने केला खास विक्रम