बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूझीलंड संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत देखील सांघिक खेळ दाखवत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले. यानंतर, स्पर्धेचा अंतिम सामना बेस्ट ऑफ थ्री पद्धतीने खेळवावा अशी मागणी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी केली होती. आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांचे याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान समोर आले आहे.
गांगुली यांनी दिली प्रतिक्रिया
न्यूझीलंडने २०१९ पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत पाऊस तसेच अंधुक प्रकाशामुळे वारंवार खेळात बाधा आल्यानंतरही न्यूझीलंडने संयम राखत भारताला पराभूत करत, या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कशा पद्धतीने खेळवावा, याबाबत विचारले असता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, “स्पर्धेची व्याप्ती जसजशी वाढत जाईल तसतशी आयसीसी अनेक बाबींकडे लक्ष देईल. सध्या तरी या संदर्भात काही बोलणे घाई ठरेल. आता काही काळ वाट पहावी लागेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळविण्याची कल्पना चांगली आहे. मला वाटते की, कसोटी हे क्रिकेटचे सर्वात मोठे आणि भक्कम स्वरूप आहे. आयसीसीला सर्व बाजूंकडून अभिप्राय मिळतील आणि भविष्यात याबाबत नक्कीच विचार जाईल.”
या खेळाडूंनी केली होती बेस्ट ऑफ थ्रीची मागणी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता एका सामन्याऐवजी बेस्ट ऑफ थ्री म्हणजे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने निवडला जावा, अशी अनेक खेळाडूंनी मागणी केली होती. यामध्ये भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर, दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांचा समावेश होता. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने एकाच सामन्याचा पर्याय योग्य असल्याचे सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी हरभजनला मारायला हॉटेलमध्ये गेलो मात्र…’, ‘त्या’ भांडणाबाबत अख्तरचा मोठा खुलासा
WTC फायनलचा हिरो जेमिसन टी२० सामन्यात संघाला नाही मिळवून देऊ शकला विजय, तुफानी खेळी गेली व्यर्थ
‘मी जे दाखवतोय, ते तुम्ही पाहू शकता का? दीपक चाहरच्या प्रश्नावर चाहत्यांनी पाडला प्रतिक्रियांचा पाऊस