उपांत्यफेरीत स्थान मिळविण्यासाठी विजय अनिवार्य असणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्यात दक्षिण आफ्रिका १९१ धावांवर बाद झाली. भारतासमोर जिंकण्यासाठी ५० षटकांत १९२धावांचे लक्ष आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य आहे हे भारतीय गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षकांनी आज दाखवून दिले.
आफ्रिकेकडून सलामीला आलेल्या डिकॉक आणि आमला यांनी १७.३ षटकांत ७६ धावांची संथ पण भक्क्म सलामी आफ्रिकेला दिली. आमला मोठी खेळी उभारेल असे वाटत असतानाच उमेश यादवच्या जागी संघात स्थान दिलेल्या अश्विनने त्याला एमएस धोनीकरवी झेलबाद केले. डिकॉकही अर्धशतक करून माघारी परतला.
धावा घेताना संवादातील अभावामुळे आणि भारतीय खेळाडूंच्या अचूक क्षेत्ररक्षणामुळे एबी डिव्हिलिअर्स १६ धावांवर तर डेविड मिलर १ धावेवर धावबाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या डुप्लेसीलाही विशेष चमक दाखवता आली नाही. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर तो ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या डुमिनीने एका बाजूने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या बाजूने त्याला विशेष साथ मिळाली नाही आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ १९१ धावांवर बाद झाला.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने २, बुमराहने २ तर अश्विन, पंड्या आणि जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली तर भारताला ३ विकेट्स रन आऊटच्या स्वरूपात मिळाल्या.