आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये बुधवारी (११ फेब्रुवारी) झालेला १३वा सामना कोणीच विसरणार नाही. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. या सामन्याचा निकाल ४० षटकानंतर नाही तर ४४ षटकानंतर लागला. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका जिंकला.
झाले असे की अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ६ विकेट्स गमावत १८७ धावा केल्या. यामध्ये विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन यांनी अर्धशतकी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानेही २० षटकात १८७ धावा केल्या. त्यामध्ये सलामीवीर- फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजची ८४ धावांची खेळी उल्लेखनीय ठरला. तसेच लुंगी एनगिडीने ४ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १७ धावा केल्या, तेवढ्याच धावा दक्षिण आफ्रिकेने केल्याने दुसरी सुपर ओव्हर झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २३ धावा केल्या. येथे मात्र अफगाणिस्तान कमी पडला आणि ते केवळ १९ धावा करू शकले. यावेळी त्यांच्या २ विकेट्सही गेल्या.
सुपर ओव्हरचा इतिहास पाहिला, तर दोन्ही संघांना त्याचा चांगलाच अनुभव आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका मात्र नशीबवान आहे. त्यांनी याआधीही टी२०मध्ये सुपर ओव्हरचा सामना जिंकला आहे. २०१९मध्ये केपटाऊनमध्ये झालेल्या त्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेला पराभूत केले होते. आज त्यांनी अफगाणिस्तानला हरवले. यावरून त्यांनी आंतरारष्ट्रीय टी२०मध्ये खेळलेल्या दोन्ही सुपर ओव्हरच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याबाबतीत अफगाणिस्तान मात्र खूपच दुर्दैवी आहे.
अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये आतापर्यंत एकूण तीन सुपर ओव्हरचे सामने खेळले. ते तिन्ही त्यांनी गमावले आहेत. त्यामध्ये आताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना, २०२४मध्ये बेंगलोरमध्ये झालेला भारताविरुद्धचा सामना आणि २०२०मध्ये नोए़डामध्ये खेळला गेलेला आयर्लंडविरुद्धचा सामना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही सामने भारतात खेळले गेले असून भारताविरुद्धचा सामनाही दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला होता.
अफगाणिस्तानच्या पराभवानंतर त्यांचे सुपर-८ मधील प्रवेशाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचे या स्पर्धेत दोन सामने बाकी असून ते युएई आणि कॅनडा विरुद्ध आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा सामना बरोबरीत झाल्यावर सुपर ओव्हरमध्ये निकाल (टी२०)
विजय विरुद्ध श्रीलंका, केपटाऊन, २०१९
विजय विरुद्ध अफगाणिस्तान, अहमदाबाद, २०२६ टी२० विश्वचषक
अफगाणिस्तानचा सामना बरोबरीत झाल्यावर सुपर ओव्हरमध्ये निकाल (टी२०)
पराभव विरुद्ध आयर्लंड, नोएडा, २०२०
पराभव विरुद्ध भारत, बेंगळुरू, २०२४ (दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये)
पराभव विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, २०२६ विश्वचषक (दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये)






