टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मधील सामना शुक्रवारी (21 जून) दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झाला. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या संघानं इंग्लंडवर 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. यासह एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील संघानं उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 च्या दोन सामन्यांतील हा सलग दुसरा विजय आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा 18 धावांनी पराभव केला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना 24 जून रोजी वेस्ट इंडिजशी होणार आहे. आफ्रिकेनं हा सामना जिंकला किंवा सामना रद्द झाला तरी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. तर दुसरीकडे या पराभवामुळे इंग्लंडवर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार लटकत आहे.
या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा केल्या. संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं सर्वाधिक 65 धावांची खेळी खेळली. त्याला डेव्हिड मिलरनं (43) शानदार साथ दिली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावाच करू शकला. संघाकडून हॅरी ब्रूकनं सर्वाधिक 53 धावा ठोकल्या. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. लियाम लिव्हिंगस्टोननं 17 चेंडूत 33 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. क्विंटन डी कॉकला त्याच्या योगदानासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाचा नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्रात 5 सामने खेळले जाणार; पुण्यात किती सामन्यांचं आयोजन?
सुपर 8 सामन्यात बांग्लादेशचे हे 3 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, टीम इंडियाला राहावं लागेल सावध