टी20 विश्वचषक 2024 च्या 21व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर बांग्लादेशचं आव्हान होतं. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांग्लादेशवर 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं टी20 विश्वचषकात एक इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिका टी20 विश्चषकाच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करणारी टीम बनली आहे. या सामन्यात एडन मार्करमच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 113 धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात, बांग्लादेशचा संघ पूर्ण 20 षटकं खेळून 109 धावाच करू शकला.
यापूर्वी टी20 विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याच्या बाबतीत भारत आणि श्रीलंकेचे संघ संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. आता या लिस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं अव्वल स्थानी झेप घेतली आहे. 2014 च्या टी20 विश्वचषकात श्रीलंकेनं न्यूझीलंडविरुद्ध 119 धावांचा बचाव करताना 59 धावांनी विजय मिळवला होता. तर टीम इंडियानं नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 119 धावांचा बचाव केला होता.
या यादीत अफगाणिस्ताची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. संघानं 2016 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध 123 धावांचा यशस्वी बचाव केला होता. या सामन्यात अफगाणिस्ताननं 6 धावांनी विजय मिळवला होता. चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडची टीम आहे. किवी संघानं 2016 च्या टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध 126 धावांचा बचाव करताना 47 धावांनी शानदार विजय नोंदवला होता.
बांग्लादेशविरुद्धच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचे या विश्वचषकात 3 सामन्यांत 3 विजय झाले आहेत. यासह आफ्रिका सुपर 8 साठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला 4 गडी राखून धूळ चारली होती. आता संघाचा पुढील सामना 15 जून रोजी नेपाळ विरुद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला
दक्षिण अफ्रिकेचा बांग्लादेशवर 4 धावांनी दणदणीत विजय!
गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पराभवाचं कारण; म्हणाले, आम्ही 15 ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होतो, मात्र त्यानंतर…