मागच्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांची परिस्थिती खूपच बदलली आहे. क्रिकेटमध्ये खेळाडूंना कोरोना संक्रमण होऊ नये, यासाठी बायो बबलची व्यवस्था केली गेली आहे. पण तरीदेखील खेळाडूंना कोरोना संक्रमण होतेय. आता या विषाणूचा प्रभाव कमी झाल्यासराखे वाटत असले तरी, अजूनही नवीन रुग्ण समोर येतच आहेत. दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीला आता कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना संक्रमण झाल्यामुळे एन्गिडी आगामी नेदरलँड संघाविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत सहभाग घेऊ शकणार नाही. तो मागच्या जवळपास चार महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशात २६ नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या दक्षिण अफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला देखील तो आता मुकणार आहे.
टी२० विश्वचषकानंतर खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत दक्षिण अफ्रिकेच्या अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. यामध्ये कर्णधार टेम्बा बावुमा, यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक, फलंदाज एडन मार्करम, वॅन डर डसेन, वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि एन्रिक नॉर्किए यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पुढच्या महिन्यात भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी संघात पुनरागमन करतील. अशात नेदरलँडविरूद्धच्या मालिकेसाठी फिरकी गोलंदाज केशव महाराजकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
क्रिकेट साऊथ अफ्रिकाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एन्गिडीला कोरोना लागण झाल्याची माहिती दिली. तसेच वेगवान गोलंदाज लिजाड विलियम्स देखील या मालिकेतून बाहेर पडला आहे. विलियम्सच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यामुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. अशात एन्गिडीच्या जागी वेगवान गोलंदाज जूनियर डाला याला संघात सामील केल्याचेही या पोस्टमध्ये सांगितले गेले आहे. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने क्रिकेट साऊथ अफ्रिकाच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, एन्गिडी चांगल्या परिस्थितीत आहे आणि मेडीकल स्टाफ एन्गिडी आणि लिजाड या दोघांवर लक्ष ठेवून आहे.
एन्गिडी २०२१ च्या जुलै महिन्यात त्याच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयर्लंड दौऱ्यावर खेळला होता. त्यानंतर तो श्रीलंका दौऱ्यात देखील सहभागी नव्हता. टी२० विश्वचषकात तो संघासोबत होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, दरम्यानच्या काळात त्याने २०२१ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले आणि त्याच्या संघाने जेतेपद जिंकले.