सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध सुरु असलेल्या सहाव्या वनडे सामन्यात ७ फलंदाज ३६.६ षटकात १५१ धावांत गमावले आहेत. भारताकडून या सामन्यात आत्तापर्यंत शार्दूल ठाकूरने ३ बळी घेतले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून खाया झोन्डोने अर्धशतक झळकावले आहे.
ठाकूरने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हाशिम अमलाला(१०) आणि प्रभारी कर्णधार एडिन मार्करमला(२४) सुरवातीलाच बाद करून भारताला यश मिळवून दिले होते. मात्र यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि खाया झोन्डो यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सांभाळला. पण डिव्हिलियर्सला युझवेंद्र चहलने ३० धावांवर असताना त्रिफळाचित करून त्यांची जोडी फोडली.
डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर हेन्रिक क्लासेनने(२२) झोन्डोला साथ देण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही जसप्रीत बुमराहने बाद केले. क्लासेनच्या पाठोपाठ लगेचच फरहान बेहार्डीनला(१) ठाकूरने तर ख्रिस मॉरिसला(४) कुलदीप यादवने बाद केले.
या सामन्यात शानदार अर्धशतक करताना झोन्डोने ७४ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी युझवेंद्र चहलने संपुष्टात आणली. हार्दिक पंड्याने झोन्डोचा चांगला झेल घेतला.
सध्या दक्षिण आफ्रिका ३८ षटकात ७ बाद १५८ धावांवर खेळत असून मोर्ने मॉर्केल आणि अँडिल फेहलूकवयो नाबाद फलंदाजी करत आहेत.