सेंच्युरियनमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिका 2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ बनला आहे. त्यांनी प्रथमच या प्रतिष्ठित स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे भारताच्या अंतिम फेरीच्या पोहचण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. सध्या भारत आणि
ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला या सामन्यासह मालिकेतील शेवटचा सामना देखील जिंकावा लागेल. तसं न झाल्यास टीम इंडिया फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचे 11 सामन्यांत 7 विजय, 3 पराभव आणि 1 अनिर्णित यासह 88 गुण झाले आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी 66.67 आहे. आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. या पराभवासह पाकिस्तान आता आठव्या स्थानावर घसरला आहे. 11 सामन्यांपैकी पाकिस्ताननं फक्त 4 जिंकले असून 7 गमावले आहेत. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 30.30 आहे.
आफ्रिकन संघ हा सामना हरला असता तर भारताची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता जास्त होती. परंतु या विजयामुळे भारताला आता शेवटचे दोन सामने जिंकावेच लागतील. कारण यानंतर भारताचा एकही कसोटी सामना नाही. मात्र या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचे आणखी दोन सामने आहेत, जे त्यांना श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहेत.
सेंच्युरियनमध्ये झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे 10 सामन्यांत 6 विजय आणि 3 पराभवांसह 76 गुण होते. त्यांची विजयाची टक्केवारी 63.33 होती. या काळात दक्षिण आफ्रिकेचा एक सामना अनिर्णित राहिला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत फक्त एका विजयाची आवश्यकता होती.
दुसरीकडे, गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात देखील कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 15 सामने खेळले, ज्यात त्यांनी 9 जिंकले, तर 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यांना 10 गुणांची पेनल्टीही मिळाली आली. कांगारुंच्या विजयाची टक्केवारी 58.89 आहे.
भारतीय संघानं 17 सामने खेळले. त्यापैकी संघानं 9 सामने जिंकले, तर सहा सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघानं दोन सामने अनिर्णित राखले आहेत. यादरम्यान भारताला 2 गुणांचा दंड ठोठावण्यात आला. भारत 55.88 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा –
दक्षिण आफ्रिकेची WTC फायनलमध्ये थाटात एंट्री! रोमहर्षक कसोटीत पाकिस्तानचा पराभव
बुमराहसारखा दुसरा कोणीच नाही! मेलबर्न कसोटीत केले हे 5 मोठे रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन मीडियानं केला विराट कोहलीचा घोर अपमान, ट्रोलिंगच्या सर्व मर्यादा पार