आज (26 फेब्रुवारी) केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात (South Africa Vs Australia) शेवटचा आणि निर्णायक आंतरराष्ट्रीय टी20 सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत.
2 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) हे याच मैदानावर पुन्हा एकदा खेळणार आहेत, जेथे ते चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळले होते.
तरीही, यापुर्वी सुरक्षा व्यवस्थेचा कडा बंदोबस्त करण्यात आला आहे. जेणेकरून खेळाडूंना प्रेक्षकांच्या कोणत्याही गैरवर्तनाला सामोरे जावे लागणार नाही.
मार्च 2018मध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. या मलिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान टीव्हीवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला (Cameron Bancroft) सँडपेपरचा तुकडा लपवताना पाहण्यात आले होते.
तसेच त्याच दिवशी संध्याकाळी स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टने यासंबंधी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुद्दाम चेंडूंशी छेडछाड केल्याचे कबूल केले होते. मात्र, नंतर या प्रकरणात वॉर्नरही दोषी असल्याचे समजले होते.
त्यामुळे वॉर्नर आणि स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली होती. पण या निलंबनाचा कालावधी पूर्ण करत स्मिथ आणि वॉर्नरने मागीलवर्षी विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले होते.





