दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने पोर्ट एलिजाबेथ येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात नाबाद शतक झळकावले. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले आहे.
आमलाचे हे वन-डे क्रिकेटमधील 27वे शतक असून यावेळी त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. 27 वे शतक करताना त्याने कोहलीपेक्षा दोन डाव कमी घेतले आहेत.
कोहलीने त्याचे 27वे वन-डे क्रिकेटचे शतक 169 डावांमध्ये पूर्ण केले होते. तर आमलाने 167 डावातच ते पूर्ण केले आहे.
त्याचबरोबर पहिल्यांदाच आमलाचे प्रथम फलंदाजी करतानाचे शतक व्यर्थ गेले आहे. याआधी त्याने प्रथम फलंदाजी करताना 20 शतके केली असून त्या सगळ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी ठरली आहे.
या सामन्यात आमलाने सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 120 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे वन-डेमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पाचव्या क्रमाकांवर आला आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने 49, विराट कोहलीने 39, रिकी पॉंटींगने 30 आणि सनथ जयसुर्याने 28 शतके केली आहेत.
या सामन्यात पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने 86 आणि मोहम्मद हाफिजने नाबाद 71 धावा करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भुमिका निभावली आहे. यामुळे पाकिस्तानने या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 शतके करणारे खेळाडू (डावांनुसार)-
167 डाव – हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
169 डाव – विराट कोहली (भारत)
254 डाव – सचिन तेंडुलकर (भारत)
308 डाव – रिकी पॉंटींग (ऑस्ट्रेलिया)
404 डाव – सनथ जयसुर्या (श्रीलंका)
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स?






