भारत दौर्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांची वनडे मालिका ४-१ ने जिंकली. बुधवारी (१७ मार्च) लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यातही भारताचा पराभव झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिताली राजच्या नाबाद अर्धशतकी खेळीनंतरही(७९) भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत केवळ १८८ धावा करू शकला. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने १० चेंडूपूर्वी पाच गड्यांनी हा सामना जिंकला.
मिताली राजची एकाकी झुंज
आधीच मालिका गमावलेल्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. दोन्ही सलामीवीर स्मृति मंधाना व प्रिया पूनिया प्रत्येकी १८ धावा करून बाद झाल्या. मागील सामन्यातील शतकवीर पूनम राऊत या सामन्यात अपयशी ठरली. तिने १० धावा बनविल्या. त्यानंतर, कर्णधार मिताली राज व उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र, हरमनप्रीत ३० धावा बनवून रिटायर्ड हर्ट झाली.
त्यानंतर, दुसर्या टोकाने नियमित अंतराने भारताचे बळी गेले. मितालीने एक बाजू सांभाळत अखेरपर्यंत नाबाद राहून ७९ धावा काढल्या. भारतीय संघाने आपल्या ५० षटकात ९ बाद १८८ धावा बनविल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी नॅडीन डी क्लेर्कने सर्वाधिक ३ बळी घेतले.
फलंदाजांच्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेचा विजय
भारताने दिलेल्या १८९ धावांच्या आव्हानसमोर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे तीन बळी अवघ्या २७ धावांत पडले. मात्र, त्यानंतर युवा एनिकी बॉश व मिन्गन डू प्रिझ यांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावा जोडून संघाला विजयाच्या दिशेने नेले. दोघींनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. अखेरीस एम केप आणि डी क्लेर्कने ५८ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयीरेषेपार नेले.
लिझे ली ठरली मालिकावीर
पहिले अर्धशतक झळकावणार्या एनिकी बॉशला सामनावीर तर, संपूर्ण मालिकेत दमदार फलंदाजी करणाऱ्या लिझे लीला मालिकावीर घोषित करण्यात आले. वनडे मालिकेनंतर या मैदानावर तीन सामन्यांची टी२० मालिकादेखील खेळली जाईल, जी २० मार्चपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
नुकताच विवाहबंधनात अडकलेला जसप्रीत बुमराह ‘या’ तारखेला पतरणार क्रिकेटच्या मैदानात
इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू देखील ‘मिस्टर ३६०’; भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
जसप्रीत बुमराहचा रोमँटिक अंदाज; पत्नी संजनासह डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल






