fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताला चँपियन बनवणारा प्रशिक्षक म्हणतोय, मला परत टीम इंडियासोबत काम करायचंय

south african former opening batsman gary kirsten says, i can guide indian cricket team

मुंबई । दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर फलंदाज गॅरी कर्स्टन हे भारताचे सर्वात यशस्वी विदेशी प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २८ वर्षांनंतर २०११ साली आयसीसी विश्व करंडक चषक जिंकला होता. या विजयानंतर संघातील खेळाडूंनी प्रशिक्षक गॅरी यांना खांद्यावर घेऊन संपूर्ण मैदानात फिरवत विजयी उत्सव साजरा केला होता. २००८ ते २०११ सलग तीन भारतीय संघाला मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

५२ वर्षीय गॅरी कर्स्टन यांनी मायदेशी परतल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. आता नऊ वर्षांनंतर पुन्हा ते भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होऊ इच्छितात. त्यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रशिक्षकांच्या कौशल्याविषयी बोलताना कर्स्टन म्हणाले, प्रशिक्षकाकडे प्रत्येक खेळाडूला योग्य सांभाळण्याचे कौशल्य असले पाहिजे. प्रत्येक खेळाडूला पुढे जाण्यासाठी संधी दिली पाहिजे. प्रशिक्षकाने संघात असे वातावरण तयार केले पाहिजे की त्यापासून संघ यशस्वी झाला पाहिजे. संघाच्या यशाची संपूर्ण जबाबदारीही प्रशिक्षकांवर असते.

गॅरी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करताना म्हणाले की, एमएस  धोनी हा एक अविश्वसनीय क्रिकेटपटू आहे. तल्लख बुद्धिमत्ता, शांत आणि संयमी स्वभाव, असा हा एक मॅच विनर खेळाडू इतरांपेक्षा वेगळा आहे. २०११ च्या विश्वचषकातल्या अनेक आठवणी आहेत. धोनीकडून या विश्वचषकात अनेक अपेक्षा होत्या. त्याने त्या योग्य रीतीने पूर्णही केल्या. त्याच्या निवृत्तीवर कोणीही दबाव टाकता कामा नये. निवृत्तीचा निर्णय तो योग्य वेळी घेईल.

गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले होते. विश्वकरंडक जिंकल्यानंतर ही गॅरी यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती बीसीसीआयने केली होती. मात्र, परिवाराचे कारण पुढे करत त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

You might also like