सध्या आयपीएल 2025चा हंगाम सुरू आहे. दरम्यान क्रिकेटचे चाहते अगदी उत्सुकतेने सर्व सामने पाहत आहेत. पण आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी 300 धावांचा आकडा गाठला जाईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शेवटच्या आयपीएल हंगामात पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी निर्दयीपणे गोलंदाजांची धुलाई केली होती, ते पाहून असा अंदाज लावला जात आहे की, यंदाच्या हंगामात हा संघ एका डावात 300 धावा धावफलकावर लावू शकतो.
तरीही प्रश्न अजूनही तोच आहे की, हे कधी होईल? मात्र, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) याबाबत आधीच भविष्यवाणी केली आहे. त्याने ती तारीखही सांगितली, जेव्हा आयपीएलमध्ये प्रथमच 300 धावांचा आकडा गाठला जाईल. डेल स्टेनने 23 मार्च 2025 रोजी सनरायझर्स हैदराबादच्या पहिल्या सामन्यानंतर ही भविष्यवाणी केली होती.
त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिलं होतं, “छोटीशी भविष्यवाणी. 17 एप्रिलला आपण आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 300 धावांचा डोंगर गाठलेला पाहू. कोण जाणे, कदाचित मी सुद्धा ते पाहण्यासाठी तिथे उपस्थित असेन.”
Small prediction.
— Dale Steyn (@DaleSteyn62) March 23, 2025
April 17 we’ll see the first 300 in IPL.
Who knows, I might even be there to see it happen.
डेल स्टेनने ही भविष्यवाणी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 मधील दुसऱ्या सामन्यानंतर केली होती. या सामन्यात हैदराबादने राजस्थानविरुद्ध 20 षटकांत 286 धावा धावफलकावर लावल्या होत्या. हा आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्कोअर आहे. यावेळी हैदराबाद केवळ 2 धावांनी आपलाच रेकाॅर्ड मोडण्यात अपयशी ठरली. आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध संघाने 287 धावांचा रेकाॅर्ड केला होता.
स्टेनची ही भविष्यवाणी खरी ठरणार की नाही? याकडे देखील चाहत्यांचे लक्ष्य असेल. सनरायझर्स हैदराबाद 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे मैदानावर खेळणार आहे. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. वानखेडे मैदानावरील सीमारेषा लहान आणि खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये धावांचा ऐतिहासिक रेकाॅर्ड पाहायला मिळणार का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल.
हैदराबादचे फलंदाज हंगामाच्या पहिल्या सामन्यानंतर लय हरवून बसले होते, पण मागील सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध 246 धावांचे लक्ष्य पूर्ण करत त्यांनी पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. आता चाहत्यांना मुंबई विरूद्ध हैदराबाद सामन्यात डेल स्टेनची भविष्यवाणी खरी ठरण्याची प्रतीक्षा आहे.
डेल स्टेनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आयपीएलमध्ये एकूण 95 सामने खेळले असून, त्यात त्याने 97 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजी सरासरी 25.85 असून, इकॉनॉमी रेट 6.91 आहे. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 8 धावात 3 विकेट्स अशी आहे.