सध्या क्रिकेटजगतात लिजेंड्स लीग क्रिकेटची चर्चा आहे. स्पर्धेचा दुसरा हंगाम यावर्षी भारतात खेळला जाईल. सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतात. यापूर्वीच अनेक माजी खेळाडूंनी आपण स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर, आता दक्षिण आफ्रिकेचा सर्वकालीन महान अष्टपैलू जॅक कॅलिस याने देखील आपली उपलब्धता सांगितली आहे.
जॅक कॅलिसला क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महान अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते. कसोटी व वनडे या दोन्ही प्रकारात १०,००० धावा आणि २५० हून अधिक बळी घेणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटबाबत बोलताना तो म्हणाला की, “एलएलसीचा भाग बनणे आणि लीगच्या दुसऱ्या हंगामात खेळणे हा अनुभव चांगला असेल. मैदानावर पुन्हा एकदा इतर दिग्गजांसह खेळण्यास मी उत्सुक आहे.”
मागील वर्षी या स्पर्धेत तीन संघ खेळले होते. यामध्ये इंडिया महाराजा, एशिया लायन्स व वर्ल्ड जायंट्स यांचा समावेश होता. यात वर्ल्ड जायंट्सने विजेतेपद पटकावलेले. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात चार संघ खेळणार असून, ११० माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होण्याची शक्यता आहे.
स्पर्धेचा दुसरा हंगामाही ओमान येथे होणार होता. मात्र, चहा त्यांच्या आग्रहास्तव ही स्पर्धा आता भारतात खेळवली जाईल. स्पर्धेचे ठिकाण अद्याप ठरले नसले तरी, रायपूर अथवा कटक येथे स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील अनेक दिग्गज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारताकडून वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, पठाण बंधू या नामांकित खेळाडूंनी खेळण्याचे जाहीर केले आहे. आशिया संघासाठी यावेळी मुथय्या मुरलीधरन, मिसबाह उल हक, थिसारा परेरा हे खेळताना दिसतील. इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये नुकताच निवृत्त झालेला इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांसह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
भावा, विराटने टी२० विश्वचषक खेळलाच पाहिजे! भारताच्या दिग्गजाने बोलून दाखवलेच
‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर