दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ साठी संघ जाहीर केला आहे. मंगळवारी (१२ मे) दक्षिण आफ्रिकेने १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यातील एका खेळाडूच्या निवडीने चर्चा सुरू झाली आहे. संघात दिग्गज वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
इस्माईलने विश्वचषकासाठी आपली निवृत्ती मागे घेतली आहे. यामुळे आता तिच्या संघात असण्याने दक्षिण आफ्रिकेची ताकद वाढली आहे. तिला असलेला अनुभव संघासाठी महत्वाचा ठरणार असून ती संघासाठी टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तिने ११३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १२३ विकेट्स घेतल्या आहेत.
ही ३७ वर्षीय खेळाडू २०२३ मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला टी२० विश्वचषकात खेळली होती. त्यामधील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व पुन्हा एकदा लॉरा वॉल्वार्ट करणार आहे. ती उत्तम फॉर्ममध्ये असून आयसीसी महिली टी२० फलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच संघात मारिझान कॅप आणि डेन व्हॅन निकर्क यांचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे.
मागील दोन आवृत्त्यांमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर यावेळी दक्षिण आफ्रिकेला पुढे जाण्याची आशा आहे. या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना १३ जूनला आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध असून तो मॅंचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका २५ मे रोजी युकेला रवाना होतील. विश्वचषकाआधी ते ३१ मे ते ४ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सराव सामने खेळणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ – लॉरा वॉल्वार्ट (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, शबनिम इस्माईल, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, काराबो मेसो, नॉनकुलुलेको म्लाबा, कायला रेनेके, तुमी सेखुखुने, डेन व्हॅन निकर्क.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मधील दक्षिण आफ्रिकेचे साखळी सामने-
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १३ जून, मॅंचेस्टर
विरुद्ध पाकिस्तान, १७ जून, बर्मिंघम
विरुद्ध भारत, २१ जून, मॅंचेस्टर
विरुद्ध नेदरलॅंड्स, २५ जून, ब्रिस्टल
विरुद्ध बांग्लादेश, २८ जून, लॉर्ड्स






