आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) 234 च्या स्ट्राईक रेटने दमदार आणि नाबाद खेळी करत आपल्या संघाला एकट्याच्या जिवावर सामना जिंकवून दिला. सध्या नामिबियामध्ये एक त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. शनिवार (29 ऑगस्ट) रोजी विंडहोक येथे या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे (SA vs ZIM) यांच्यात खेळला गेला.
ब्रेविसच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने हा सामना 7 विकेट्स राखून सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. संघाकडून सलामीवीर ब्रायन बेनेटने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर, तादिवानाशे मारुमानीने 30 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 25 धावांचा आकडा गाठता आला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 13.4 षटकांत 3 विकेट्स गमावून सहज विजय मिळवला. संघाची 32 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर ब्रेविस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 32 चेंडूंत 7 चौकार आणि 6 तुफानी षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली. या शानदार खेळीसाठी ब्रेविसला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ (सामनावीर) हा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या या खेळीमुळे आफ्रिकेचा विजय अतिशय सोपा झाला.
या विजयामुळे आफ्रिकन संघाला मोठा दिलासा मिळाला असेल. तसेच, ब्रेविसशिवाय आफ्रिकेसाठी सलामीवीर लुहान-ड्रे प्रेटोरियसने 22, तर दुसरा सलामीवीर जॉर्डन हरमनने 20 धावा केल्या. टोनी डी जोर्झीने 15 धावा, तर ब्रेविसला साथ देताना रुबिन हरमनने नाबाद 11 धावा केल्या.
या त्रिकोणी मालिकेतील पहिला सामना आफ्रिका आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात अशी गोष्ट घडली ज्याची कदाचित कोणालाही अपेक्षा नसेल. यजमान नामिबियाने आफ्रिकेचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 163 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने आफ्रिकेला 20 षटकांत 9 विकेट्सवर 145 धावांवर रोखले. आता झिम्बाब्वेविरुद्ध मिळालेल्या या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.






