आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात कोणत्या गोलंदाजाने १६ बळी घेतले आहेत? पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावे आहे? खऱ्या क्रिकेटप्रेमींना याचे उत्तर माहीत असेल. पण, बरेच लोक याचे उत्तर शोधण्यासाठी, गुगल वापरतील. त्यावेळी गुगल उत्तर देईल, भारतीय लेगस्पिनर ‘नरेंद्र हिरवानी’. सध्याच्या पिढीतील बर्याच जणांनी नरेंद्र हिरवानींचे नाव ऐकले नसेल. त्यांच्या पदार्पणातील विक्रमाविषयी जाणून घेतल्यानंतर, अनेकांना असे वाटेल की, नरेंद्र हिरवानी यांनी भारतासाठी खेळताना ३००-४०० बळी तरी नक्की घेतले असतील. परंतु दुर्दैवाने तसे काही घडले नाही. हिरवानी केवळ त्या एकाच विक्रमासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखले जातात आणि त्या एका कसोटीनंतर त्यांची कारकीर्द म्हणावी तशी बहरली नाही.
भारत हा जगाच्या पाठीवरील एक विशाल देश आहे. भारतातील प्रत्येक तरुण क्रिकेटसोबत भावनिकरित्या आणि मनापासून जोडला गेलेला आहे. आपण भारतीय संघाची निळी जर्सी घालून भारताचे प्रतिनिधित्व करावे, अशी या तमाम खेळाडूंची इच्छा असते. याच हजारो मुलांप्रमाणे हिरवानी यांनाही क्रिकेटवर प्रेम होते आणि आपण एक दिवस भारतीय संघात खेळावी अशी त्यांची इच्छा होती. याच, इच्छेचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी लहानपणापासून प्रयत्न सुरू केले.
गोरखपुर सोडून झाले इंदोरला स्थायिक
हिरवानी यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचा. घरी बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता होती. त्यांच्या वडिलांचा वीटभट्टीचा मोठा व्यवसाय होता. मात्र, क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी त्यांनी गोरखपुर सोडले. वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी ते गोरखपूर सोडून मध्यप्रदेशातील इंदोर येथे दाखल झाले. मध्य प्रदेशचे त्यावेळचे मोठे क्रिकेटपटू असलेल्या संजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंदोर येथे प्रशिक्षणाला सुरुवात केली.
प्रथमश्रेणी क्रिकेटमधील जबरदस्त आकडेवारी
आपल्या जादूई लेगस्पिनच्या जोरावर व जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने हिरवाणी यांनी सोळाव्या वर्षी मध्य प्रदेशसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्यांनी पाच बळी घेत सर्वांची वाहवा मिळवली. १९८४ चा तो पहिलाच देशांतर्गत हंगाम त्यांच्यासाठी सर्वोत्तम ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकोणीस वर्षाखालील भारतीय संघाकडून खेळताना, त्यांनी तीन सामन्यात २३ बळी मिळवण्याची कामगिरी केली. हिरवानी यांनी १९८७-८८ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्टइंडीज संघाविरुद्ध, भारताच्या २५ वर्षाखालील संघाकडून खेळताना निवडसमितीला आकर्षित करेल असे, प्रदर्शन केले. त्या सामन्यात पहिल्या डावात त्यांना बळी मिळविण्यात अपयश आले. मात्र, दुसऱ्या डावात त्यांनी वेस्ट इंडीजचे सहा गडी गारद केले. याच, कामगिरीने त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दार उघडे झाले.
विश्वविक्रमी आंतरराष्ट्रीय पदार्पण
हिरवानी यांचा वेस्ट इंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या व अखेरच्या मद्रास कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. मालिकेतील, दिल्ली येथे झालेली पहिली कसोटी वेस्ट इंडीजने जिंकत आघाडी घेतली होती. मुंबई आणि कोलकता कसोटी अनिर्णित राहिल्याने, मद्रास कसोटी भारतासाठी महत्त्वाची होती. त्यात, नियमित कर्णधार दिलीप वेंगसरकर दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नव्हते. त्यांच्या जागी अनुभवी रवी शास्त्री यांच्याकडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले होते.
सामन्याच्या दिवशी भारताकडून नरेंद्र हिरवाणी, डब्ल्यू रमन व अजय शर्मा यांनी तर, वेस्ट इंडीजकडून फिल्म सिमन्स यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. भारताने कपिल देव यांच्या १०९ व अरुण लाल यांच्या ६९ धावांच्या बळावर ३८२ धावा धावफलकावर लावल्या. भारताच्या पहिल्या डावातील धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी, वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरला आणि पदार्पण करणाऱ्या, हिरवानी यांच्या फिरकीच्याच्या जाळ्यात सापडला. एकटे विवियन रिचर्ड्स सोडले तर, सर्व वेस्ट इंडीयन फलंदाज हिरवानी यांच्या फिरकीपुढे चाचपडले. हिरवानी यांनी आठ बळी मिळवत, वेस्ट इंडिजचा डाव १८४ धावांवर संपवला.
भारताच्या दुसऱ्या डावात, पदार्पण करणारे सलामीवीर वूर्करी रमण यांनी ८३ धावांची बहुमूल्य खेळी केली. मोहम्मद अजहरुद्दिन यांनीसुद्धा ३९ धावांचे योगदान दिले. भारताने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित करत, वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ४१६ धावांचे आव्हान ठेवले. वेस्ट इंडीजच्या धुरंदर फलंदाजांनी पुन्हा १९ वर्षीय हिरवानी यांच्यासमोर लोटांगण घातले. हिरवानी यांनी दुसऱ्या डावातही ८ बळी घेत, वेस्ट इंडिजचा डाव १६० धावांवर रोखत, भारताला २५५ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. सोबतच, भारताने मालिकादेखील बरोबरीत राखली.
दबावामुळे झाली कामगिरीत घसरण
हिरवानी यांच्या पहिल्यात सामन्यातील विश्वविक्रमी पराक्रमामुळे लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. लोकांना वाटू लागले की, हिरवानी यांनी प्रत्येक सामन्यात अशीच काहीशी कामगिरी करावी. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशातील चाहत्यांकडून केली जाणारी अपेक्षा, हिरवानी पूर्ण करू शकले नाहीत आणि दबावात त्यांच्या कामगिरीत घसरण होऊ लागली. एका सामन्यात १६ बळी असा खेळ, ही एकदाच होत असतो, याचा विसर बहुदा लोकांना पडला आणि आणि याचा परिणाम एका युवा लेगस्पिनरच्या खेळावर झाला.
हिरवानी हे नंतर मनासारखे प्रदर्शन न झाल्याने मानसिकरित्या खचले. विदेशी भूमीवर ते बळी मिळविण्यात अपयशी ठरले. त्यांना संघात स्थान दिल्याने, अनेक वादही निर्माण झाले. अशातच, भारतीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेचा उदय झाला. कुंबळेच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, हिरवानी आपसूकच बाजूला होत गेले. हिरवानींना आठ वर्षाच्या काळात फक्त १७ कसोटी खेळण्याची संधी मिळाली. वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाले तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी १६७ प्रथमश्रेणी सामने खेळत तब्बल ७३२ बळी मिळवले.
नरेंद्र हिरवानी यांच्याविषयी अनेक जण म्हणतात की, हिरवानी यांच्याकडे विविधतेचा अभाव होता. ते फक्त भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करू शकत. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तर त्यांना माहीतच नव्हते. अजून काही मेहनत घेतली असती तर, कदाचित ते भारताचे सर्वोत्तम लेगस्पिनर ठरले असते. हिरवानी यांच्यासारख्या खेळाडूने भारतीय क्रिकेट संघासाठी १०० बळी न मिळवणे, दुर्दैवी होते.
भारतासाठी फक्त १७ कसोटीत खेळलेले हिरवानी पुढे जावून, भारतीय संघाचे निवडकर्ता बनले. आजही, त्यांनी पदार्पणाच्या कसोटीतील मिळवलेले १६ बळी त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकवून आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया वनडे संघाचा नवा कर्णधार जाहीर! डेविड वॉर्नरला बसला मोठा धक्का
मराठीत माहिती- क्रिकेटर जयदेव उनाडकट