काउंटी क्रिकेट…ज्या इंग्लंडने क्रिकेट जगभरात रुजवले त्या इंग्लंडची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा. या स्पर्धेला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा असेही संबोधले जाते. फक्त इंग्लंडच नाहीतर इतर देशांतील चांगले-चांगले क्रिकेटपटू आपल्या खेळात सुधारणा व्हावी म्हणून, विविध काउंटी क्लबकडून खेळत असतात. अशा या समृद्ध स्पर्धेमुळे, इंग्लंडला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू मिळत आले आहेत. याच काउंटीतून पुढे येत, एक खेळाडू इंग्लंड संघासाठी खेळला. अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत, त्याने इंग्लंडचे कर्णधारपद देखील भूषवले आणि इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान त्याला मिळाला. इंग्लंडने २००५ ऍशेस ज्याच्या नेतृत्वाखाली जिंकली, तो हा कर्णधार म्हणजेच मायकल वॉन.
क्रिकेटची पार्श्वभूमी
मॅंचेस्टर येथे जन्मलेल्या (29 ऑक्टोबर) वॉनचे कुटुंब त्याच्या लहानपणी शेफील्ड येथे स्थायिक झाले. त्याचे पणजोबा जॉनी टिलडेस्ले हे इंग्लंडकडून काही सामने खेळले होते. अभियंता असलेले वॉनचे वडील वर्सी एकादशचे नेतृत्व करायचे. त्यांनाच पाहून वॉनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शेफील्ड येथील सिल्वरडेल स्कूलमध्ये जाऊ लागल्यानंतर तो काही काळ फुटबॉलकडे वळाला. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू व मँचेस्टर युनायटेडचा माजी कर्णधार गॅरी नेव्हिल हा त्याचा खास मित्र आणि फुटबॉल संघातील सहकारी होता. फुटबॉल सोडून जेव्हा वॉन क्रिकेट खेळू लागला, तेव्हा त्याने शेफील्ड कोलिगेट्स क्रिकेट क्लबसाठी खेळणे सुरु केले.
वॉनसाठी क्रिकेट बोर्डाला नियम बदलले पडले भाग
वॉनमधील क्रिकेटची प्रतिभा सर्वप्रथम ओळखली ती यॉर्कशायरचे प्रशिक्षक असलेल्या डग पॅडगेट यांनी. याच पॅडगेट यांचा वॉनला मोठा क्रिकेटपटू बनवण्यात मोलाचा हातभार आहे. डर्बीशायरचा रहिवासी असलेला पॅडगेट शेफील्ड विरुद्ध यॉर्कशायर यांच्यातील सामना पाहण्यासाठी आला होता. जेवणाच्या वेळात वॉन इतर मुलांसमवेत मैदानावर खेळत होता. वॉनने मारलेले काही प्रेक्षणीय फटके पाहताना पॅडगेट यांना त्याच्यातील गुणवत्ता असलेला क्रिकेटपटू दिसला. पॅडगेट यांनी तात्काळ त्याला बोलवून घेतले आणि यॉर्कशायरसाठी खेळण्याबाबत विचारले.
पॅडगेट यांच्या प्रस्तावाला वॉनने होकार दिला. वॉन राजी झाला तरी यॉर्कशायर काउंटी बोर्ड हे वॉनला खेळवण्यासाठी तयार नव्हते. यॉर्कशायर काउंटी बोर्डच्या नियमानुसार, फक्त यॉर्कशायरमध्ये जन्मलेल्या खेळाडूंना त्या क्लबसाठी खेळण्याची परवानगी होती आणि वॉनचा जन्म मँचेस्टरचा होता. पॅडगेट हे कोणत्याही परिस्थितीत वॉनला यॉर्कशायरमध्ये खेळण्यासाठी जिद्दीला पेटले. त्यांनी बोर्डाशी याबाबत वाददेखील घातला. अखेरीस, एका वर्षानंतर यॉर्कशायर काउंटी बोर्डाने नियम बदलून वॉनला खेळण्यासाठी परवानगी दिली.
इंग्लंड अंडर-१९ संघाचा कर्णधार
यॉर्कशायरच्या वयोगट संघांसाठी खेळल्यानंतर, वॉनने इंग्लंडच्या सतरा वर्षाखालील संघात खेळत व्यवसायिक क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे, १९९३-१९९४ च्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या एकोणीस वर्षाखालील संघाचे नेतृत्व त्याच्याकडे देण्यात आले. त्यानंतर, वॉनने सलग चार हंगाम यॉर्कशायरकडून शानदार कामगिरी केली.
पदार्पणातच करावा लागला संघर्ष
सन १९९९ च्या अखेरीस वॉनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात संघाची अवस्था २ बाद २ धावा अशी असताना त्याला फलंदाजीची संधी मिळाली. वॉनने संघर्षपूर्ण ३३ धावा बनवत संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकला. त्यानंतर तो सतत इंग्लंड कसोटी संघाचा सदस्य राहिला. २००१ मध्ये वॉनने पाकिस्तान विरुद्ध आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्याच वर्षी भारत दौऱ्यावर बेंगलोर कसोटीवेळी फलंदाजी करताना चेंडू हाताळल्यामुळे त्याला बाद देण्यात आले.
कारकिर्दीतील सुवर्णवर्ष
वॉनसाठी २००२ हे वर्ष कारकिर्दीतील सर्वात्कृष्ट वर्ष ठरले. संपूर्ण वर्षात त्याच्या बॅटमधून १,४३१ कसोटी धावा निघाल्या. २००२ ऍशेसमध्ये तीन कसोटीत ६०० धावा काढत त्याने, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात येऊन ६०० धावा काढणारा पहिला फलंदाज बनण्याचा मान मिळवला. त्याच वर्षी त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान देखील पटकावले.
कर्णधार वॉन आणि ऍशेस २००५
नासिर हुसेनने २००३ च्या मध्यात इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून वॉनची निवड झाली. सातत्यपूर्ण कामगिरीचे त्याला बक्षीस मिळाले होते. इंग्लंडने २००५ ऐतिहासिक ऍशेसमध्ये मिळवलेल्या विजयामागे अनेक कारणे सांगितली जातात; मात्र, वॉनने आपल्या संघाची बांधणी खूप पूर्वीपासून सुरू केली होती, ही वस्तुस्थिती आहे. मजबूत ऑस्ट्रेलियाला हरवत; इंग्लंडला परत मिळवून देण्यात वॉन आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचे महत्वाचे योगदान होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा उतरता काळ
वॉनच्या गुडघ्याच्या दुखापतीने; २००६-२००७ ऍशेसपूर्वी उचल खाल्ली. त्यामुळे त्याला त्या मालिकेला मुकावे लागले. इंग्लंडला, वॉनची उणीव भासली आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५-० अशा फरकाने धूळ चारली. पुनरागमनानंतर, वॉनने इंग्लंडने खेळलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात संघाचे नेतृत्व केले. पाठोपाठ, २००७ विश्वचषकात देखील तोच इंग्लंडचा कर्णधार होता. विश्वचषकात इंग्लंडची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली. विश्वचषकानंतर तो दुखापतीमुळे वारंवार संघाच्या आत बाहेर होत राहिला.
निवृत्ती
सततच्या दुखापती व खराब फॉर्ममुळे २००८ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. २००९ मध्ये यॉर्कशायरसाठी अखेरचा काउंटी सामना खेळत; सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून त्याने निवृत्तीची घोषणा केली.
जबरदस्त आकडेवारी
आपल्या नऊ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वॉनने ८२ कसोटीत ५,७१९ धावा जमविल्या. यात १८ शतकांचा समावेश होता. वॉनने ८६ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना; १,९८२ व आपल्या नावे केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वॉनला आपल्या कारकीर्दीत एकही एकदिवसीय शतक ठोकता आले नाही. वॉन आकडेवारीच्या बाबतीत इंग्लंड क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. इंग्लंडने वॉनच्या नेतृत्वात ५१ कसोटी व ६० एकदिवसीय सामने खेळले. त्यात इंग्लंडला अनुक्रमे २६ व ३२ सामन्यात विजय मिळाले.
समालोचक आणि लेखक म्हणून दुसरी इनिंग
निवृत्तीनंतर वॉन समालोचक, लेखक आणि उद्योगपती अशा तिहेरी भूमिकांत दिसला. तो कायम आंतरराष्ट्रीय व जगभरातील विविध लीगमध्ये समालोचन करताना दिसत असतो. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनुभवांवर त्याने ईयर इन द सन, टाईम टू डिक्लेअर आणि कॉलिंग शॉट्स ही तीन पुस्तके लिहिली आहेत. त्याने बार्बाडोसमध्ये काही गुंतवणूक देखील केली आहे. तो ट्विटरच्या माध्यमातून, अनेकदा आपल्या परखड भूमिका मांडत असतो.
मार्कस ट्रेस्कॉथिकसोबत सलामीला येत, इंग्लंडला अनेक विजय मिळवून देणाऱ्या, ‘वॉनी’ नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या वॉनचे इंग्लिश क्रिकेटमधील योगदान न विसरण्यासारखे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी