गदग हा कर्नाटकातील एक जिल्हा. आता जिल्हा असला तरी ८० च्या दशकात गदग हे एक छोटंसं गावं होतं. गदग म्हटलं की संगीत शौकिनांना ते भिमसेन जोशींचं जन्मगाव असल्याचं आठवतं. या गदगने संगीताबरोबरच भारतीय क्रिकेटलाही एक हिरा दिला. तो म्हणजे सुनिल जोशी.
सुनिल शाळेत असताना दररोज पहाटे ३:३० ला उठे. सगळी आवराआवर करून ४ वाजता गावातून ट्रेन पकडून ७० किलोमीटर दूर हुबळीला जाई. तेथे ६:३० ते ९:३० क्रिकेटचा सराव करून बसने परत येई आणि पुन्हा शाळेचं आवरुन वेळेवर शाळेतही जाई. फक्त क्रिकेटच्या वेडापायी तो हा सारा द्राविडी प्राणायाम लिलया करत होता.
सुनिल बरीच वर्षे शालेय क्रिकेट खेळला. कर्नाटककडून १५, १९ आणि २२ वर्षाखालील अशा सर्व संघांमध्ये तो खेळला. एके दिवशी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सराव करत असताना सुनिलची गोलंदाजी तेव्हाचे भारताचे खेळाडू सईद किरमाणी यांनी पाहिली. त्याच्या गोलंदाजीने प्रभावित होऊन ते म्हणाले, “या मुलाकडे लक्ष द्या. याचे भविष्य उज्वल आहे.”
किरमाणींचे शब्द सुनिलने खरे ठरवले. १९९२-९३ च्या हंगामात कर्नाटकच्या रणजी संघात सुनिलची निवड झाली. राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद अशा ज्येष्ठ खेळाडूंबरोबर सुनिल खेळू लागला. आपल्या पहिल्या रणजी सामन्यात त्याने नाबाद ८३ धावा काढल्या. अयोध्येची दंगल झाल्याने तो सामना अर्धवट थांबवण्यात आला. या पहिल्या हंगामात सुनिलने ३ सामन्यांत ९४ धावा करत ७ बळी मिळवले.
दुसऱ्या हंगामात बंगलोरला मुंबईविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुनिलने ७ व्या क्रमांकावर खेळायला येऊन शतक ठोकले आणि सईद किरमाणीबरोबर द्विशतकी भागीदारी करत कर्नाटकला ४०० धावांचा डोंगर उभारून दिला. याच सामन्यात मुंबईकडून रवी शास्त्री (१५१) आणि साईराज बहुतुले (नाबाद १३४) यांनीही शतके झळकावली होती. या सामन्यानंतर रवी शास्त्रीने सुनिलजवळ येऊन त्याला सांगितले होते, “तू जर भारतासाठी खेळला नाहीस तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल.”
रवी शास्त्रीसारख्या खेळाडूने केलेल्या कौतुकामुळे सुनिलचा आत्मविश्वास दुणावला. एव्हाना तो कर्नाटकच्या रणजी संघाचा नियमित सदस्य झाला होता. १९९५-९६ च्या रणजी हंगामात सुनिलने ९ सामन्यांमध्ये ५२ बळी आणि ५२९ धावांची कमाई केली. या हंगामात कर्नाटकने अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक जिंकला.
या हंगामात केलेल्या कामगिरीने सुनिलने निवड समितीचे लक्ष वेधले आणि जून १९९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली. भारतीय संघातील आपल्या निवडीची बातमी सुनिलला कळाली तेव्हा तो गदगमधील आपल्या महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देत होता. अचानक परीक्षा केंद्राबाहेर फटाके वाजले आणि लोकांचा गोंधळ ऐकू आला. काय झाले आहे असा विचार करत असतानाच पर्यवेक्षकाने सुनिलच्या कानात त्याची भारतीय संघात निवड झाल्याचे सांगितले. ते ऐकताच आनंदाच्या भरात आपला पेपर देऊन सुनिल बाहेर आला. त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी मिरवणूक काढून सुनिलला त्याच्या घरी नेले.
भारताकडून कसोटीमध्ये सुनिलने पदार्पण केले खरे. मात्र याच सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि एकही चेंडू न टाकता तो इंग्लंडहून मायदेशी परतला. दरम्यान सुनिलची भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाली. सप्टेंबर १९९६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सुनिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने १० षटकांत ३७ धावा देत २ बळी मिळवले होते.
पुढील वर्षी १९९७-९८ मध्ये सुनिलचा सहभाग असलेल्या कर्नाटकच्या संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली आणि १९९८-९९ मध्ये स्वतः सुनिलच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक जिंकला.
कुंबळेसारखा गोलंदाज संघात असताना सुनिलला बऱ्याचदा दुय्यम फिरकी गोलंदाजाची भूमिका पार पाडावी लागली. कुंबळेबरोबर गोलंदाजी करायला त्यावेळी बोर्डाने सुनिलबरोबरच निखील चोप्रा, आशिष कपूर असे वेगवेगळे गोलंदाज वापरून बघितले. या रोटेशन पद्धतीचाही फटका त्याला बसला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुनिलची लक्षात राहणारी कामगिरी म्हणजे १९९९ साली त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० षटकांत फक्त ६ धावा देत मिळवलेले ५ बळी. यातली ६ षटके निर्धाव होती. तीन वर्षांनी विस्डेनने प्रसिद्ध केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजीच्या सर्वोत्तम दहा कामगिरींमध्ये सुनिलच्या या कामगिरीला सातवे स्थान मिळाले होते. एवढी एक कामगिरी सोडली तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुनिलला फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून खेळलेल्या ६९ एकदिवसीय सामन्यात सुनिलने ६९ बळी मिळवले. सुनिल चेंडूला हवेत जास्त वेळ ठेवतो, त्यामुळे फलंदाजाला तो चेंडू फटकावणे सोपे जाते, अशी टीकाही त्याच्यावर झाली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसा न चमकलेला सुनिल कसोटीमध्येही फार काही करू शकला नाही. बांगलादेशचा संघ २००० साली भारताविरुद्ध आपली पहिली कसोटी खेळला. या कसोटीमध्ये सुनिलने मिळवलेले ८ बळी आणि संघ अडचणीत असताना केलेल्या ९२ धावा हीच काय ती त्याची कसोटीमधील आठवणीत राहणारी कामगिरी ठरली. या कसोटीनंतर लगेचच भारत दौऱ्यावर आलेल्या झिम्बाब्वे संघाच्या अँडी फ्लॉवरने सुनिलची भरपूर धुलाई केली. कुंबळेविना ही मालिका खेळणाऱ्या भारताच्या फिरकीची धुरा समर्थपणे पेलण्यात सुनिल अयशस्वी ठरला. ही कसोटी मालिका त्याची भारताकडून शेवटची ठरली. १९९६ ते २००० या कालखंडामध्ये सुनिलने भारताकडून १५ कसोटी सामने खेळत ४१ बळी मिळवले. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सतत बळी मिळवणारा सुनिल आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र स्वतःला सिद्ध करू शकला नाही.
भारताकडून २००० साली आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेला सुनिल त्यानंतरही १० वर्षे देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेपासून ७ वर्षे दूर असतानाही आयपीएलच्या पहिल्या हंगामात २००८ साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने त्याला करारबद्ध केले. जवळजवळ २० वर्षे कर्नाटकडून खेळल्यानंतर २०११ साली सुनिलने आपला शेवटचा रणजी सामना खेळला. या सामन्यातही त्याने ६८ धावांत ७ बळी मिळवले. आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीमध्ये सुनिलने १६० सामन्यांत ६१५ बळी आणि ५१२९ धावा अशी कामगिरी केली. यात ४ शतके व २६ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि ५०० बळी अशी कामगिरी करणाऱ्या निवडक खेळाडूंच्या यादीमध्ये सुनिलचा समावेश आहे.
२०१२ साली सुनिलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली. त्याअगोदर २०११ सालापासूनच त्याने हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद संघाने रणजी करंडकाच्या प्लेट डिव्हिजनमधून एलिट डिव्हिजनमध्ये जाण्याची कामगिरी केली. या कामगिरीमुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने त्याला मुदतवाढ दिली होती.
सुनिल ज्यांना आपले मार्गदर्शक मानतो, त्या बिशनसिंग बेदी यांच्याकडून २०१४ साली त्याने जम्मू आणि काश्मीरच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. सुनिल प्रशिक्षक असताना जम्मू आणि काश्मीरच्या संघाने विजय हजारे चषकात सेहवाग, गंभीर असे महान फलंदाज असलेल्या दिल्लीला हरवले. त्यानंतर या संघाने ४० वेळचे रणजी करंडक विजेते असणाऱ्या मुंबईला वानखेडेवर हरवण्याची किमया साधली.
जम्मू आणि काश्मीरनंतर पुढे २०१५ मध्ये ओमानचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक, २०१६ मध्ये आसामच्या रणजी संघाचा प्रशिक्षक आणि २०१७ मध्ये बांगलादेश संघाचा फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून त्याने काम केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला कसोटीमध्ये हरविण्याचा पराक्रम केला. यात फिरकी गोलंदाजांनी मोठी कामगिरी केली होती. परिणामी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुनिलचा प्रशिक्षकपदाचा करार सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढवला.
खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करण्यासाठी त्याला तो व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या कॅनरा बॅंकेने नेहमीच मोलाची साथ दिली. बँकेमार्फत त्याला वेळोवेळी सुट्टी दिली जाते आणि या सुट्ट्यांसाठी बँकेचे आभार मानायला सुनिल विसरत नाही. नुकतीच सुनिलची भारताच्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या नियुक्तीनंतर बोलताना सुनिल म्हणाला होता की, ‘या देशाची सेवा करण्याची संधी मिळाणे हा मी सन्मान समजतो.’
सुनिलची क्रिकेट कारकीर्द
एकदिवसीय
सामने – ६९ बळी – ६९
कसोटी
सामने – १५ बळी – ४१
प्रथम श्रेणी
सामने – १६० बळी – ६१५
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’
दक्षिण आफ्रिकेसाठी धोक्याची घंटी! Team Indiaच्या प्रमुख खेळाडूने सुरू केलाय सराव, पाहा Video