-आदित्य गुंड
आयपीएल संपल्यावर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार हे सर्वश्रुत आहे. या दौऱ्यासाठीच्या भारतीय संघनिवडीबाबत विविध माध्यमांतून चर्चा होत असतानाच काल संध्याकाळी बीसीसीआयने एक मोठी प्रेसनोट प्रसिद्ध केली. यातली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळून भारतात परत येणार. विराट परत का येतोय याचे कारणही सगळ्यांना माहीत आहे. विराटची पत्नी अनुष्का लवकरच आई होणार आहे. तिच्या बाळंतपणासाठी तिच्यासोबत असणे गरजेचे असल्याने विराटने बीसीसीआयकडे दौऱ्याच्या मधूनच आपल्याला भारतात परतण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. बीसीसीआयने ती विनंती मान्यही केली.
ही बातमी येताच काही लोक समाजमाध्यमांतून विराटवर टीका करू लागले. तो कसा दौरा अर्धाच सोडून परत येतोय, त्याला कसे देशाबद्दल प्रेमच नाही, देशहित सोडून विराट कुटूंबाला प्राधान्य कसा देऊ शकतो? अशी स्तुतीसुमने अनेकांनी उधळली. विराट दौरा अर्धा सोडून जसं काही गंभीर गुन्हा करतोय की काय? असे वाटावे अशा पद्धतीने ही चर्चा होऊ लागली आहे. आपल्या अपत्याच्या जन्मासाठी बाप म्हणून दौरा अर्धवट सोडून विराट खरंच काही चुकीचं करतोय का?
अजिबात नाही. विराट जे करतोय ते योग्यच करतोय. गरोदर स्त्रीला सर्वाधिक आधार आणि गरज कुणाची असेल तर ती आपल्या नवऱ्याची. तिच्यासोबत अगदी तिची आई जरी असली तर आपला नवरा बाळंतपणाच्या वेळी आपल्यासोबत असावा असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. काही बोलून दाखवतात काही बोलत नाहीत. भारतात स्त्रियांना बाळंतपणाची रजा मिळते. पुरुषांना मात्र ही रजा मिळण्याची कोणतीही तरतूद नाही. अलीकडे काही खाजगी कंपन्यांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबित पुरुषांनाही ही रजा देणे सुरू केले आहे ही चांगली गोष्ट आहे.
बीसीसीआय हीदेखील एक खाजगी संस्था आहे. भले त्यावर सरकारी प्रशासक असले तरी या संस्थेचा कारभार अजूनही खाजगीच आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूंना अशी रजा द्यायची अथवा नाही हा सर्वस्वी बीसीसीआयचा निर्णय आहे. याला अनुसरून त्यांनी विराटला रजा मंजूर केली. यात विराट आणि बीसीसीआयचे काही चुकले असे बिलकुल नाही.
आपल्याकडे कधी या दिशेने फारसा विचार झालेलाच नाही. असेल तर तो तेवढ्यापुरता होऊन तिथेच विरून गेला. इतर देशांचे खेळाडू दौऱ्यावर असताना याच कारणाने मायदेशी गेले तर आपण त्यांचं कौतुक करतो. शेन वॉटसन,जो रूट, आपला रोहित शर्मा आणि अगदी परवाकडे ख्रिस वोक्स ही काही उदाहरणे. वोक्सने तर आपल्या मुलाच्या जन्मानंतर घरी वेळ घालवणे गरजेचे आहे ह्या कारणाने आयपीएलसारखी मोठी स्पर्धा न खेळण्याचे ठरवले. रुटने इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान एका कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. तर आपल्या मुलांबरोबर वेळ घालवता यावा म्हणून केविन पीटरसन २०२० आयपीएलमधून समालोचन सोडून गेला. या खेळाडूंच्या बाबतीत “बरोबर आहे, बायकोबरोबर असणं गरजेचं आहे.” वगैरे म्हणणारे आपण भारतीय खेळाडूंच्या बाबतीत मात्र याच्या विरुद्ध भूमिका घेतो.
परवा आयपीएलच्या एका सामन्या दरम्यान विराटने प्रेक्षकांत बसलेल्या अनुष्काला खुणेने ‘जेवलीस का?’ असे विचारले. अनेक माध्यमांनी त्याच्या या कृतीची बातमी केली, मीमर्सने मीम बनवत इथेही त्याची खिल्ली उडवली. विराटचं असं काय चुकलं? उलट गरोदर असलेल्या आपल्या बायकोने वेळेवर जेवण घेतले की नाही याची खात्री करत त्याने सामन्यादरम्यानही तिची काळजी घेत आहोत हे दाखवून दिले. अनेक वेळा मैदानावर उपस्थित नातेवाईकांकडे पाहून खेळाडू सेलिब्रेशन करतात, हातवारे करतात. तेव्हा अनेक वेळा त्याची चर्चा होते. कौतूकही होते. येथेही विराटच्या नशिबात ट्रोलिंगचं आले.
अजून एक गोष्ट. परवा सुनील गावसकर यांनी विराट अनुष्का यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. ते वक्तव्य गावसकरांचे ते वक्तव्य चुक किंवा बरोबर या मुद्द्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. मीडियाने नेहमीप्रमाणे आपल्याला सोयीस्कर असा त्याचा अर्थ लावत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. विराटने यावर प्रतिक्रिया न देणे पसंत केले तर अनुष्काने गावसकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अनुष्काला तिचे म्हणणे सोशल मीडियावर मांडले. त्याला कोणतीही हरकत न घेऊन किंवा सपोर्टही न करुन विराटने खरे तर स्त्री स्वातंत्र्याला पाठिंबाच दिला. गावसकरांवर टीका करताना, अनुष्काचे कौतुक करताना विराटच्या ही कृती मात्र दुर्लक्षित राहिली.
आता थोडं भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकडे बघूयात. या दौऱ्यातील दोन कसोटी डिसेंबर महिन्यातच होऊन जाणार आहेत. विराटच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाचा मुहूर्त जानेवरी २०२१ मध्ये आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नसती तर कदाचित विराट दुसरी कसोटीही खेळला असता. मात्र ऑस्ट्रेलियातून परत आल्यावर आपल्या पत्नीबरोबर राहण्यास जाण्याआधी त्यालाही विलगीकरणात रहावे लागणार आहे. सरकारकडून हे नियम आता थोडे शिथिल केले गेले असले तरी स्वतः विराट हा धोका पत्करेल असे वाटत नाही. त्यामुळे त्याला एक कसोटी खेळून परत यावे लागतेय. उलट विराटने एकही कसोटी न खेळता परत यायला हवे. त्याच्या जागी संघात येणाऱ्या खेळाडूला आणि भारतीय संघाला याचा फायदाच झाला असता. परंतू येथे विराटने योग्य ताळमेळ साधलेला दिसतोय.
या सगळ्यावर काहीजण धोनीचे उदाहरण देऊन युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतील. धोनीच्या मुलीच्या जन्माच्या वेळी तो विश्वचषक खेळत होता. त्याने त्यावेळी भारतात येणे टाळले होते. मुळात असे निर्णय त्या त्या व्यक्तीचे वैयक्तिक असतात. जसा धोनीने न येण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा सगळ्यांनी आदर केला त्याचप्रमाणे विराटच्या परत येण्याच्या निर्णयाचाही आदर केलाच पाहिजे. कारण विराट चुकीचं काहीच करत नाहीये हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे.
बाप होणे ही भावनाच खूप वेगळी आहे. इतर वेळी मनाने खंबीर असलेले भलेभले पुरुष आपल्या तान्ह्या बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर आनंदाने ढसाढसा रडतात. हे सगळं प्रत्यक्षच अनुभवले पाहिजे. बायकोच्या बाळंतपणासाठी दौरा अर्धवट टाकून परत येणारा विराट उलट समस्त पुरुषवर्गाला, भावी पिढीला आदर्श घालून देतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच्या या कृतीमुळे कदाचित भारतातील अनेक पुरुषांची, भावी वडिलांची विचारसरणी बदलण्यास मदत होईल. शेवटी जर असे तारे आपल्या कृतीतून आदर्श घालून देत असतील तर त्यांचे अनुकरण करणारे असंख्य चाहतेही असतात. बायकोचे बाळंतपण हे तिचे एकटीचे नसून त्या उभयतांचे बाळंतपण आहे ही विचारसरणी रुजण्यास हातभार लागेल. एकीकडे मैदानावर देशासाठी खेळत असताना, संघ बिकट परिस्थितीत असताना खंबीरपणे किल्ला लढविणाऱ्या खेळाडूने दुसरीकडे नात्याबद्दल हळवे असणे यात असे काय चूक आहे? अखेर विराटही माणूसच आहे. त्याच्याही भावनांचा आदर केलाच पाहिजे. त्याने दौरा भलेही अर्ध्यातून सोडू देत. मात्र ज्या कारणासाठी त्याने हे केलंय त्याबद्दल त्याचा अभिमानच वाटला पाहिजे.