– अनिल भोईर
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनला यजमान पद प्राप्त झाले आहे. याआधी १९७१, २००० व २००६ साली झालेल्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हाने यजमानपद भूषवले होते. १९५०-५१ सालापासून सुरू झालेल्या यास्पर्धेचा खूप मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडला जातो.
जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा पुरुषाचे जिल्हा व व्यावसायिक संघ तर महिलांचे क्लबचे संघही सहभागी व्हायचे. १९५८ पर्यतचे आकडे उपलब्ध नाही. १९५९ पासून विजेतेपदाचा इतिहास बघता पुरूष गटात सर्वाधिक वेळ विजेतेपद पुणे जिल्हा (१३ वेळा), मुंबई जिल्हा (११ वेळा), मुंबई शहर (१० वेळा), मुंबई उपनगर (५ वेळा), रायगड (४ वेळा), सांगली (४ वेळा), ठाणे (३ वेळा) असे आहेत. १९८२ पासून मुंबई जिल्ह्याचे मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्हा असे विभाजन झाले.
महिला गटात १९६० नंतरचे विजेते बघता पुणे जिल्हाने सर्वाधिक (२१ वेळा), मुंबई शहर (९ वेळा), मुंबई जिल्हा (४ वेळा) नाशिक जिल्हा (४ वेळा), कोल्हापूर जिल्हा (३ वेळा), मुंबई उपनगर (२ वेळा) आदी संघांनी विजेतेपद पटकावली आहेत. महिला विभागात १९७२ पर्यत क्लबचे संघ खेळत होते. तेव्हा नवयुग क्रीडा मंडळ, साधना क्रीडा मंडळ मुंबई या संघाचा दबदबा होता.
पुरुष गटात आतापर्यंत मुंबई जिल्हा (१९६९, १९७०, १९७१) व मुंबई शहर (१९८२, १९८३, १९८४) या दोन संघानी विजेतेपदाची हट्रिक साधली होती. महिला गटात पुणे जिल्हा (१९८०, १९८१, १९८२) कोल्हापूर जिल्हा (१९९५, १९९७, १९९८) नाशिक जिल्हा (१९९९, २०००, २००१) अशी हट्रिक साधली होती. तर २००६ ते २०१६ पर्यत सलग १० विजेतेपद पटकावून पुणे जिल्हा महिला संघाने वर्चस्व प्रस्थापित केले होते. क्लब संघ असताना नवयुग क्रीडा मंडळ संघाने सलग चार वेळा विजेतेपद पटकावली होती.
मागील ५ स्पर्धेतील विजेते व उपविजेते पुरुष संघ:-
- २०१८:- विजेतेपद- रायगड, उपविजेते- सांगली
- २०१७:- विजेतेपद- पुणे, उपविजेते- कोल्हापूर
- २०१६:- विजेतेपद- पुणे, उपविजेते- मुंबई उपनगर
- २०१५:- विजेतेपद- मुंबई उपनगर, उपविजेते- पुणे
- २०१४:- विजेतेपद- मुंबई उपनगर, उपविजेते- पुणे
मागील ५ स्पर्धेतील विजेते व उपविजेते महिला संघ:-
- २०१८:- विजेतेपद- पुणे, उपविजेते- मुंबई उपनगर
- २०१७:- विजेतेपद- मुंबई उपनगर, उपविजेते- पुणे
- २०१६:- विजेतेपद- पुणे, उपविजेते- मुंबई उपनगर
- २०१५:- विजेतेपद- पुणे, उपविजेते- मुंबई उपनगर
- २०१४:- विजेतेपद- पुणे, उपविजेते- मुंबई उपनगर