क्रिकेटच्या मैदानावर काही गोष्टी रोज रोज होत नसतात. या रोज न होणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे गोलंदाज घेत असलेला बळींची हॅट्ट्रिक. ऑस्ट्रेलियन गोलंदाज फ्रेड स्पोफोर्थ यांनी १८८९ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय हॅट्ट्रिक घेतल्यानंतर, आजपर्यंत फक्त ४६ हॅट्ट्रिक कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या गेल्या आहेत. सन १९७१ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेल्यानंतर, १९८२ मध्ये पाकिस्तानच्या जलालुद्दीन यांनी पहिली एकदिवसीय हॅट्ट्रिक पूर्ण केली. ज्याप्रकारे, पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक घेण्यासाठी अकरा वर्षाचा काळ जावा लागला; त्याचप्रकारे, विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक येण्यासाठी चौथा विश्वचषक उजाडावा लागला. १९७५ मध्ये पहिला विश्वचषक झाल्यानंतर, १९८७ च्या चौथ्या विश्वचषकात पहिली हॅट्ट्रिक झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे, ही विक्रमी हॅट्ट्रिक घेण्याचा मान एका भारतीय गोलंदाजाने पटकाविला. हा भारतीय होता, भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा.
विश्वचषकातील भारताची मोहीम
सन १९८७ मध्ये, प्रथमच भारतीय उपखंडात विश्वचषक खेळला जात होता. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारत आपले विजेतेपद राखण्यासाठी खेळत होता. पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले होते. पण, जर भारताने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले नाही, तर भारताला पाकिस्तानात आपला उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागणार होता. दुसरा पर्याय म्हणजे अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला चांगल्या फरकाने हरवल्यास; इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर उपांत्य फेरी खेळण्याची संधी मिळणार होती.
भारत विरुद्ध न्यूझीलंड अखेरचा साखळी सामना
न्यूझीलंडचे कर्णधार जेफ क्रो यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली. सर्व फलंदाजांच्या थोड्याथोड्या योगदानाने न्यूझीलंड संघ ४१ षटकांत ५ बाद १८२ पर्यंत पोहोचला होता. न्युझीलंडच्या डावातील सर्वाधिक ४० धावा केलेला दीपक पटेल बाद झाल्यानंतर मार्टिन स्नेडन मैदानात उतरला.
कपिल देव यांचा अनपेक्षित निर्णय
त्याचवेळी, कर्णधार कपिल देव यांनी मनोज प्रभाकरऐवजी चेतन शर्मांना गोलंदाजीसाठी आणले. तोपर्यंत शर्मा यांनी त्यांच्या पाच षटकांत एकही बळी मिळवला नव्हता. मात्र, शर्मा हेच त्यावेळी भारताचे अखेरच्या षटकातील सर्वात्तम गोलंदाज होते. चेतन शर्मा हे देखील हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असल्याने, कपिल देव यांचा त्यांच्यावर विश्वास होता.
चेतन शर्मा हे अगदी एका वर्षापूर्वीच भारतीय क्रिकेटसाठी खलनायक ठरले होते. आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना; जावेद मियांदाद यांनी चेतन शर्मा यांना षटकार खेचत, पाकिस्तानला रोमांचक विजय मिळवून दिला होता. ही गोष्ट चाहते विसरले नव्हते. आज तेच चेतन शर्मा एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहेत, हे कोणालाही माहीत नव्हते.
‘ती’ ऐतिहासिक हॅट्रिक
चेतन शर्मा यांनी ३१ ऑक्टोबर १९८७ च्या दिवशी, न्यूझीलंडच्या डावातील ४२ वे षटक टाकताना इतिहास रचला. न्यूझीलंडचे चौथ्या क्रमांकावरील फलंदाज केन रुदरफोर्ड यांना त्यांनी षटकातील, पहिले तीन चेंडू निर्धाव टाकले. शर्मा यांनी टाकलेला चौथा चेंडू जाऊन सरळ मधल्या यष्टीवर लागला. रुदरफोर्ड यांनी २४ धावा केल्या. त्यांच्या जागी आलेल्या, यष्टीरक्षक इयान स्मिथ यांना पहिल्याच चेंडूवर यॉर्करचा सामना करावा लागला. शर्मा यांचा इनस्विंगींग यॉर्कर जाऊन उजव्या यष्टीवर लागला. शर्मा यांनी सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले होते.
सर्वांची उत्सुकता वाढली आणि शर्मा हॅट्ट्रिक करणार का? असा प्रश्न पडला. अखेरच्या चेंडूविषयी शर्मा कर्णधार कपिल देव यांच्याशी चर्चा करू लागले. इवान चॅटफील्ड पुढील फलंदाज म्हणून मैदानात उतरले. त्यांनी त्यावेळी हेल्मेटसारखे वापरले जाणारे वायझर घातले होते. शर्मा यांनी पुन्हा एकदा यॉर्कर टाकला आणि चेंडू डाव्या यष्टीवर आदळला.
तीन चेंडूत तीन बळी मिळाले होते.. तिघेही त्रिफळाचीत.. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील अवघी तिसरी हॅट्रिक पूर्ण झाली होती. विश्वचषकाच्या इतिहासातील ही पहिलीच हॅट्रिक होती.
या ऐतिहासिक कामगिरीविषयी बोलताना चेतन शर्मा आपली आठवण सांगतात, “चॅटफील्ड जेव्हा वायझर घालून आला, तेव्हा मी काहीसा आश्चर्यचकित झालो. नागपूरच्या मैदानावर असे वायझर अगदी कमी खेळाडू घालत. तेव्हा कपिल पाजींनी मला सांगितले की, ‘तो घाबरला आहे. तू सरळ यॉर्कर टाकून दे.’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी यॉर्कर टाकला आणि तो बाद झाला. मला त्यावेळी आकाश ठेंगणे झाले होते.”
त्यानंतर, न्यूझीलंडने ५० षटकात २२१ धावा फलकावर लावल्या. भारताला आपल्या गटात अव्वल स्थान मिळवायचे असल्यास ४२.२ षटकात हे आव्हान पूर्ण करायचे होते.
सुनील गावसकर यांचे संस्मरणीय शतक
अव्वल स्थान मिळवायच्या उद्देशाने, भारताची अनुभवी सलामी जोडी कृष्णम्माचारी श्रीकांत आणि सुनील गावसकर मैदानात उतरले. श्रीकांत यांनी ५८ चेंडूत ७५ धावांचा तडाखा दिला. पहिल्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात, साठ षटके फलंदाजी करून ३६ धावांची कूर्मगती खेळी केलेल्या सुनील गावसकरांनी या सामन्यात ८५ चेंडूत आपले पहिले आणि एकमेव एकदिवसीय शतक झळकावले. श्रीकांत बाद झाल्यानंतर; मोहम्मद अजहरुद्दिनने नाबाद ४१ धावा काढत गावसकर यांच्यासमवेत भारताला ३२.१ षटकात विजयी लक्ष गाठून दिले.
३१ ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने चेतन शर्मा यांची हॅट्रिक व सुनील गावसकर यांचे एकमेव एकदिवसीय शतक यासाठी खास आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
…आणि 17 वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला