आपली खूप जिवलग व्यक्ती काही काळासाठी आपल्यापासून दूर राहिली आणि लवकरच पुन्हा तिला भेटण्याची संधी आपल्याला मिळणार असेल. अशाक्षणी आपण डोळ्यात तेल टाकून त्यादिवसाची वाट पाहात असतोत. अखेर तो दिवस उजाडतो आणि मोठ्या आतुरतेने आपण त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जातो. अगदी त्यावेळीच ती व्यक्ती जग सोडून गेल्याची धक्कादायक बातमी आपल्याला मिळते.
एखाद्या चित्रपटातही असे दृश्य पाहताना अनेकांना रडू कोसळते. त्यामुळे वास्तवात अशी घटना घडण्याची कल्पनाही कुणाला करवत नाही. मात्र एका क्रिकेटपटूच्या पत्नीला वास्तवात या दु:खद प्रसंगाचा सामना करावा लागला. दिवंगत भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा (Raman Lamba) यांची पत्नी किम मिशेल क्रोथर्स यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रसंग घडला.
एकीकडे त्यांचे पती लांबा मरणाशी झुंज देत होते, दुसरीकडे त्या आपल्या पतीला भेटण्यासाठी विमानतळावर त्यांची वाट पाहात होत्या.
एका मुलाखतीत या दुर्दैवी प्रसंगाची आठवण सांगताना किम म्हणाल्या होत्या की, “बांगलादेशमधील क्रिकेट मालिका संपवून बऱ्याच दिवसांनंतर लांबा घरी पतरणार होते. त्यामुळे मी त्यांना विमानतळावर भेटण्यासाठी जाणार होते. सर्व तयारीनिशी मी घरुन निघणारच होते. तेवढ्यात मला बांगलादेशवरुन कॉल आला आणि त्यांचे निधन झाल्याचे मला कळाले. हे वृत्त ऐकून मी निशब्द झाले होते.”
एखाद्या हॉलिवूड हिरोला टक्कर देईल असे सौंदर्य असणाऱ्या लांबा यांना त्यांचे जवळचे मित्र ‘रॅम्बो’ म्हणतं असतं. अफाट प्रतिभा असूनही त्यांची क्रिकेट कारकिर्द म्हणावी तशी बहरली नाही. 2 जानेवारी 1960 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात त्यांचा जन्म झाला होता. फलंदाजीची आवड असल्याने आपले भविष्यही क्रिकेट क्षेत्रातच घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली होती.
1980 साली देशांतर्गत सामन्यांद्वारे क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या लांबा यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळण्यासाठी 6 वर्षे वाट पाहावी लागली. 1986-87 या हंगामात भिलई येथे उत्तर विभाग विरुद्ध पश्चिम विभागात यांच्यात दुलिप ट्रॉफीतील अंतिम सामना झाला होता. यावेळी उत्तर विभागाकडून खेळताना लांबा यांनी 320 धावांची मोठी खेळी केली होती. या खेळीचे बक्षीस त्यांना भारतीय कसोटी संघातील स्थानाच्या स्वरुपात मिळाले होते.
डिसेंबरच्या अखेरीस कानपुर येथे श्रीलंकाविरुद्ध झालेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात लांबा अवघ्या 24 धावांवर धावबाद झाले होते. त्यानंतर पुढे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सरासरी कामगिरी केल्याने त्यांना संघातून वगळण्यात आले. पुढे 1989 साली पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत पुनरागमनाची संधी देण्यात आली होती. मात्र, सरावादरम्यान त्यांच्या बोटाला दुखापत झाल्याने त्यांना तो सामना खेळता आला नाही. त्यांच्या बदल्यात मोहम्मद अझरुद्दीन यांना संघात घेण्यात आले होते.
लांबा यांची वनडेतील कामगिरी चांगली राहिली होती. त्यांनी 1986-87 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत 55.60च्या सरासरीने एका शतकासह आणि 2 अर्धशतकांसह 278 धावा केल्या होत्या. यासाठी त्यांना मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला होता. या कामगिरीने त्यांना प्रकाशझोतात आणले. परंतु पुढील 3 वर्षात 32 सामन्यात 783 धावा करत त्यांच्या वनडे कारकिर्दीचा शेवट झाला.
त्यामुळे 1990 मध्ये मायदेश सोडून परदेशात अर्थातच आर्यलँडमध्ये नशीब आजमावण्याचा त्यांनी निश्चय केला. येथेच लांबा यांची एका आयरिश तरुणीशी नजर भिडली आणि त्यांना ‘लव ऍट फर्स्ट साइट’ झाला. क्रिकेट मैदानाप्रमाणे प्रेमाच्या पिचवरही लांबा आघाडीवर होते. त्यांनी किम यांना पाहताक्षणीच पुढाकार घेत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांच्या याच धाडसी स्वभावावर किम फिदा झाल्या आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली.
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे लांबा 20 फेब्रुवारी 1998 रोजी ढाका येथे बांगलादेश क्रिकेट क्लब अबहानी क्रीरा चक्रकडून क्रिकेट खेळत होते. क्षेत्ररक्षणाच्या वेळी ते अगदी जवळून झेल पकडण्याच्या स्थितीत उभे होते. फलंदाजाने वेगवान शॉट मारला आणि चेंडू थेट लांबाच्या डोक्यावर आदळला. दुर्भाग्याने त्यावेळी लांबांनी हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे चेंडू लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 2 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर 22 फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांना सध्या जास्मिन नावाची मुलगी आणि कामरान नावाचा मुलगा असून लांबा यांच्या मृत्यूनंतर पत्नी किम २ मुलांसह पोर्तुगाल येथे राहतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: आऊट ऑर सिक्स? ऑस्ट्रेलियन खेळाडूने सीमारेषेवर पकडला आश्चर्यकारक झेल
जगातील दहा ‘असे’ दुर्दैवी क्रिकेटपटू, ज्यांना क्रिकेटच्याच मैदानावर गमवावे लागले आपले प्राण