भारतामध्ये ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वाधिक क्रिकेट हे मुंबई प्रांतात खेळले जात. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू नावारूपाला येत होते. १९३४ मध्ये रणजी ट्रॉफीला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतात क्रिकेटचा प्रसार झाला. त्यावेळी, पहिल्यावहिल्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व प्राध्यापक डीबी देवधर यांनी केले. देवधर हे कर्णधार असले तरी, संघाचा कणा होते १९ वर्षीय अत्यंत प्रतिभावंत मानले गेलेले विजय हजारे. आज विजय हजारे यांची १०७ वी जयंती.
क्लॅरी ग्रिमेट यांनी ओळखली चुणूक
विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी कृष्णेकाठी सांगली येथे मराठी-ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील सैन्याचा भाग असल्याने, त्यांचा ख्रिश्चन धर्माशी संबंध आला. त्यांचे शिक्षण प्रेस्बेटेरियन मिशन स्कूल सांगली येथे झाले. लहानपणापासून हजारे यांचे लक्ष पुस्तकांपेक्षा क्रिकेट आणि फुटबॉलवर जास्त राहिले.
देवासचे महाराजा विक्रम सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू क्लॅरी ग्रिमेट यांना भारतात बोलावले होते. त्यावेळी मध्यमगती गोलंदाजी किंवा थोडीफार लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या विजय हजारे यांच्यावर ग्रिमेट यांची नजर पडली. त्यांना हजारे यांची फलंदाजी अधिक आवडल्याने त्यांनी हजारे यांना फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ग्रिमेट यांचा सल्ला मानून हजारे यांनी फलंदाजीवर मेहनत करण्यास सुरुवात केली.
स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांना पहिल्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या संघाकडून त्यांनी एमसीसी विरुद्ध काही चांगल्या खेळ्या केल्या. पुढे लवकरच १९३८ मध्ये राजपुताना संघासोबत त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. १९३९-१९४० च्या हंगामात ३१६ धावांची खेळी करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विजय हजारे भारताचे रनमशीन आहेत
सन १९४६ भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असताना, त्यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंड विरुद्ध त्यांनी आपला पहिला सामना खेळला तो देखील क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्डसवर. पहिल्या सामन्यात ६५ धावा आणि दोन बळी त्यांनी आपल्या नावे केले. त्या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यावर विजय हजारे यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ४९.७७ च्या सरासरीने १,३४४ धावा व ५६ बळी अशी त्यांची कामगिरी होती.
त्यावेळी, इंग्लंडचे सर्वात प्रसिद्ध समालोचक असलेले जॉन अर्लोट यांनी विजय हजारे यांच्याबद्दल म्हटले होते की, “हजारे कधीही आपली विकेट फेकत नाहीत. कोणत्याही आकडेवारीचा विचार न करता ते आपला खेळ सुरू ठेवतात. त्यांच्यावर कोणी टीका केली तरी मला वाटते ते भारताचे खरेखुरे रनमशीन आहेत.”
भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणारे कर्णधार
इंग्लंडमधील फॉर्म त्यांनी भारतात देखील कायम ठेवला. बडोद्यासाठी खेळताना होळकर संघाविरुद्ध गुल मोहम्मद यांच्यासोबत चौथ्या गड्यासाठी त्यांनी ५७७ धावांची विक्रमी भागीदारी रचली. पुढे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध देखील त्यांच्या बॅटची धार कमी झाली नाही आणि त्यांनी पन्नासच्या सरासरीने धावा कुटल्या.
सन १९५१-१९५२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्ध दिल्ली आणि मुंबई कसोटीत त्यांनी शतके झळकावली. मद्रास कसोटीत भारतीय संघाने मिळवलेला विजय हा भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय होता आणि त्या संघाचे कर्णधार होते विजय हजारे. विशेष म्हणजे त्यांनी नेतृत्व केलेल्या १३ सामन्यांपैकी एकाच सामन्यात भारताला विजय साकारता आला.
थक्क करणारी आकडेवारी
विजय हजारे हे भारतीय क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी प्रथमता करण्यासाठी ओळखले जातात. दुलीपसिंगजी यांकडे इंग्लिश क्रिकेटपटू म्हणून पाहिले गेल्यास, खऱ्या अर्थाने पहिले त्रिशतक झळकवणारा भारतीय क्रिकेटपटू म्हणून विजय हजारे यांच्याकडे पाहिले. तसेच, १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावण्याचा मान देखील त्यांना मिळाला. याच सामन्यात हजारे यांनी डॉन ब्रॅडमन यांना बाद करण्याची किमया देखील केली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यात शतके ठोकणारे विजय हजारे हे पहिलेच भारतीय फलंदाज होते.
विजय हजारे यांची एकूण आकडेवारी पाहिली तर लोक अवाक् होतात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत २३८ प्रथमश्रेणी सामने खेळताना ५८.३८ च्या लाजवाब सरासरीने १८,७४० धावा ठोकल्या आहेत. सोबतच, ५९५ बळी देखील त्यांच्या नावे आहेत.
पद्मश्री मिळवणारे पहिले क्रिकेटपटू
महाराष्ट्र संघ सोडल्यानंतर हजारे यांनी बडोद्यामध्ये आपले बस्तान बसवले. महाराजा प्रतापसिंग गायकवाड यांच्यासाठी ते शिकारी आणि त्यांच्या सेनेचे कॅप्टन म्हणून काम पाहत. मेरीलबोन क्रिकेट क्लबने त्यांना आजीव सदस्यत्व दिले होते. निवृत्तीनंतर, जसुभाई पटेल व विजय हजारे हे भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. बीसीसीआयने देखील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या वनडे स्पर्धेला त्यांचे नाव दिले. १८ मार्च २००४ आतड्याच्या कॅन्सरमुळे त्यांचे बडोदा येथे निधन झाले.
दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे विजय हजारे यांना आपले कौशल्य म्हणावे तितके दाखवता आले नाही. त्यांना पुरेपूर संधी मिळाली असती तर, सर डॉन ब्रॅडमन व सर गॅरी सोबर्स यांच्या बरोबरीने विजय हजारे यांचे नाव घेतले गेले असते, असे सर्व क्रिकेट जाणकार मान्य करतात.
महत्वाच्या बातम्या:
टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांचे प्रमोशन! ‘त्या’ जबाबदारीसाठी सोडणार संघाची साथ
WIvENG| पहिल्या कसोटीत यजमान विंडीज फ्रंटफूटवर; बोनरचे अफलातून शतक
अखेर विनू मंकड यांच्या मुलाला मिळाला न्याय! मंकडींग विरोधातील ‘त्या’ लढ्याला आले यश