भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वीच भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या स्पर्धेला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळत आहे. पर्थच्या वाका मैदानावर भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सराव सामने खेळले आहेत. संघाचे शिबीर याच मैदानावर आहे. गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या सामन्यात 36 धावांनी पराभवाचा सामना केला. मात्र, यादरम्यान एका भारतीय दिग्गजाने ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूची भेट घेतली. आता त्यांचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
दोन फिरकीपटूंची भेट
भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने ऑस्ट्रेलियाची महिला फिरकीपटू अलाना किंग (Alana King) हिची भेट घेतली. अलानाबद्दल बोलायचं झालं, तर ती बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्स संघाविरुद्ध खेळते. अलानाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चहलसोबतचे फोटो शेअर केले. तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शनही दिले. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फिरकीपटूंची भेट. खेळाच्या अद्भूत ज्ञानासोबतच चातुर्यामध्येही कोणतीच स्पर्धा नाही. संवाद साधण्यासाठी धन्यवाद युझवेंद्र चहल.” या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला जात आहे.
Leggies unite 🤝🏾 😁
Amazing knowledge of the game and so good tactically. Thanks for the chat @yuzi_chahal #spintowin pic.twitter.com/1sVDbyizPb— Alana King (@alanaking95) October 13, 2022
‘लेडी वॉर्न’ म्हणून ओळखली जाते अलाना किंग
लेग स्पिनर अलाना 26 वर्षांची असून ती ‘लेडी शेन वॉर्न’ (Lady Shane Warne) म्हणून ओळखली जाते. तिने यावर्षीच ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण केले आहे. तसेच, तिने संघातील प्रमुख गोलंदाजाची जबाबदारी उचलली आहे. 24 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिच्या नावावर एकूण 31 विकेट्स आहेत. एँग्लो- इंडियन मूळ असलेली अलाना हिचे आई- वडील चेन्नईहून मेलबर्नमध्ये स्थायिक झाले होते. तिने यावर्षी महिला टी20 चॅलेंजमध्येही भाग घेतला होता. हरमनप्रीत कौर हिच्या सुपरनोव्हाज संघाकडून खेळताना अलानाने 3 सामन्यात 5 विकेट्सही घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात 3 विकेट्स घेऊन अलानाने तिच्या संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
टी20 विश्वचषकात चहलची महत्त्वाची भूमिका
भारतीय क्रिकेट संघ 2007नंतर एकदाही टी20 विश्वचषकाची ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. त्यामुळे भारताला या विश्वचषकात 15 वर्षांचा वनवास संपवायचा आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. युझवेंद्र चहल पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी होईल, पण तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील वर्षी त्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. टी20 क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघासाठी 69 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याच्याविरुद्ध खेळताना विचारच करू नका’, गंभीरचा भारतीय फलंदाजांना सल्ला
आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश