बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मुस्तफिजूर रेहमानवर दोन वर्ष विदेशी टी-२० लीगमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दुखापती होत असल्याने मुस्तफिजूर रेहमानला बांगलादेशकडून महत्वाच्या क्रिकेट मालिकामध्ये सहभागी होता आले नव्हते.
नुकत्याच पार पडलेल्या वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला २-० ने पराभव स्विकारावा लागला होता. तसेच नवख्या अफगानिस्तानने जूनमध्ये टी-२० मालिकेत ३-० ने धुव्वा उडवला होता.
या दोन्ही मालिकेत मुस्तफिजूर रेहमानला सहभागी होता आले नव्हते. त्याचा फटका बांगलादेश संघाला बसला होता.
आपल्या तीन वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत रेहमान फक्त १० कसोटी, २७ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळला आहे.
मुस्तफिजूर रेहमानबाबतच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“मी मुस्तफिजूरला कळवले आहे की, पुढील दोन वर्ष त्याला कोणत्याही विदेशी टी-२० लीगमध्ये सहभागी होता येणार नाही. तुम्ही विदेशी टी-२० लीगमध्ये खेळून दुखापतग्रस्त होणार आणि त्यामुळे देशासाठी उपलब्ध नसणार, हे कोणत्याही परिस्थितीत स्विकारहार्य नाही.” असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन म्हणाले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाचा मुंबई इंडियन्स संघाला मोठा फटका बसणार आहे. आता आपीएलच्या पुढील दोन मोसमांसाठी रेहमान मुंबई इंडियन्सकडून खेळू शकणार नाही. मुस्तफिजूर रेहमानचा २०१८ ते २०२० असा मुंबई इंडियन्सबरोबर तीन वर्षांचा करार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडला पराभूत करण्यासाठी आर. अश्विन आतुर
–विराट कोहलीला लवकर बाद करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉडने आखला आहे खास प्लॅन