चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त लालबाग येथील श्री सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणात गुरुवार दि.२ जानेवारी २०२० ते रविवार दि.१२ जानेवारी २०२० या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा महोत्सवात दि.२ जाने. ते दि. ६ जानेवारी २०२० या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने) स्थानिक पुरुष प्रथम श्रेणी या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

दि.७ जानेवारी ते दि.१० जानेवारी २०२० या कालावधीत मुंबई खो खो संघटना यांच्या मान्यतेने व ओम साईस्वर सेवा मंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या मुंबई जिल्हा स्तरीय कुमार/ कुमारी, पुरुष /महिला अजिंक्यपद खो – खो स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री. प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

तर दि. ११ जानेवारी २०२० रोजी ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र अमेचर मल्लखांब असोसिएशन व मुंबई मल्लखांब असोसिएशन यांच्या मान्यतेने होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार श्री.मधु अण्णा चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.

दि.१२ जानेवारी २०२० रोजी बॉम्बे ग्रेटर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने होणाऱ्या शरीर शौष्ठव स्पर्धा “चिंतामणी श्री” या स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री.अजय चौधरी यांच्या शुभहस्ते होणार आहे. क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री.उमेश सिताराम नाईक हे भूषविणार आहेत. तदप्रसंगी आचार्य धर्मराज श्री.विजय जोशी गुरुजी, आमदार सौ.यामिनी यशवंत जाधव, सौ. संजीवनी पाटील रात्रीस खेळ चाले मालिका फेम, श्री.रमाकांत रहाटे, नगरसेविका श्रीमती सिंधुताई मसुरकर, नगरसेविका सौ.सुरेखा रोहिदास लोखंडे, माजी आमदार श्री. मधु दादा चव्हाण, श्री.उदय देशपांडे – क्रीडा जीवनगौरव शिव छत्रपती पुरस्कार विजेते, मुंबई कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह श्री. विश्वास मोरे, कार्याध्यक्ष श्री. मनोहर इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती मंडळाचे मानदसाचिव श्री.वासुदेव सावंत यांनी कळविले. तसेच स्पर्धा आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सहायक सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.






