नवी दिल्ली – भारताचा माजी जलदगती गोलंदाज एस. श्रीसंत याने एक नवा खुलासा केला आहे. श्रीसंतने भारतीय संघाचे माजी मानसोपचार तज्ज्ञ पॅडी अप्टन यांच्याबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. तसेच त्याने आयपीएलमधील चेन्नई संघाबद्दलही एक मोठे विधान केले आहे.
काही खेळाडू पॅडी अप्टन यांना सन्मानजनक वागणूक देत नव्हते…
‘पॅडी अप्टन यांना भारतीय संघातील अनेक खेळाडू सन्मानजनक वागणूक देत नव्हते. पॅडी अप्टन यांची २००८ साली भारतीय संघाचे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली होती. पॅडी अप्टन आणि संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी क्रिस्टन यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत 2009 साली अग्रस्थान पटकावले होते. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाने 2011 साली विश्वचषक देखील जिंकला होता. तरिही काही खेळाडू पॅडी यांना पाहिजे तशी वागणूक देत नव्हते.’ असे एस. श्रीसंत याने म्हटले आहे.
अप्टनसोबत माझा चांगला संवाद होत असे : श्रीसंत
हॅलो या समाजमाध्यम अॅपवर बोलताना एस. श्रीसंतने वरिल खुलासा केला आहे. श्रीसंत हा स्वतः 2007 साली ट्वेंटी-ट्वेंटी आणि 2011 सालच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू होता. त्यामुळे त्याने पॅडी अप्टनबद्दल वरिल विधान केले आहे. ‘माझा अप्टन सोबत चांगला संवाद होत असे. इतर खेळाडू त्यांचा सन्मान करत नव्हते. मात्र, आम्ही दोघे चांगल्या प्रकारे बोलत होतो.’ अशी आठवणही श्रीसंत याने यावेळी सांगितली.
एस. श्रीसंत याच्या या विधानांची पार्श्वभूमी म्हणजे, पॅडी अप्टन यांचे नुकतेच प्रकाशित झालेले आत्मचरित्र. अप्टन यांनी ‘बेयरफुट कोच’ या आपल्या आत्मकथेत एस. श्रीसंतबद्दल एक घटना लिहिली आहे. पॅडी अप्टन हे, राजस्थान रॉयल संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेले आहेत. तसेच त्यावेळी राजस्थानच्या संघाचे नेतृत्व राहुल द्रविडकडे होते.
एस. श्रीसंतने तेव्हा माझा आणि राहुल द्रविडचा अनादर केला होता : अप्टन
‘एस. श्रीसंतने एकदा माझ्यासोबत आणि राहुल द्रविडसोबत वाद घातला होता. त्यामुळेच त्याला आयपीएलच्या सहाव्या हंगामात टीमच्या बाहेर ठेवण्यात आले होते.’ असे अप्टन यांनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे.
द्रविड सारख्या महान खेळाडूचा अनादर करण्याचा विचारही करु शकत नाही : श्रीसंत
एस. श्रीसंत याने मात्र पॅडी अप्टन यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच आपण ना पॅडीसोबत ना राहुल द्रविडसोबत कसलाही वाद केलाय, असे त्याने म्हटले आहे. याबाबत बोलताना श्रीसंत याने, ‘मी राहुल द्रविड सारख्या महान खेळाडूचा अनादर करण्याचा विचार देखील करु शकत नाही.’ असे म्हटले आहे. तसेच,
‘तो भारताचा माजी महान कर्णधार आहे. मात्र, ज्या गोष्टीचा उल्लेख पॅडी अप्टन करु इच्छितात ती बाब वेगळी आहे. मी, राजस्थान रॉयल्सच्या संघात असताना चेन्नई विरुद्धचा एक सामना खेळू इच्छित होतो. मात्र, मला तेव्हा डावलण्यात आले होते. त्याचे कारण काय? हेच फक्त मी राहुल द्रविडला विचारले होते.’ अशी स्पष्टोक्ती अप्टन यांच्या आरोपांचे खंडन करताना श्रीसंतने दिली आहे.
मला तेव्हा डावलण्यात आले होते…
चेन्नईच्या त्या सामन्याबद्दल बोलताना एस. श्रीसंतने आणखी काही मुद्दे पुढे आणले आहेत. ‘मी तेव्हा चेन्नई संघाविरुद्ध खेळू इच्छित होतो. त्यांच्या विरुद्ध मला राजस्थानच्या संघाला जिंकवायचे होते. त्या अगोदरच्या सामन्यात देखील धोनीला मी बाद केले होते. हे सर्व असतानाही मला संघातून का वगळले, याचे कारण मला समजले नाही. तेच मी राहुल द्रविडला विचारले होते. मात्र, हे विचारत असताना कोणताही वाद झाला नव्हता.’ असे स्पष्टीकरण श्रीसंत याने दिले आहे.
‘त्या सामन्यानंतर मला कधीच चेन्नई विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. प्रत्येक वेळी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मला वगळले गेले. यामागचे कारण मला संघ व्यवस्थापनाने अनेकदा विचारणा करुन देखील कधीच सांगितले नाही’ असेही श्रीसंत याने म्हटले आहे.
मला धोनी आणि चेन्नई संघाबद्दल तिरस्कार नाही,परंतु…
चेन्नईसंघाविरुद्ध खेळण्याच्या आपल्या प्रबळ इच्छेबद्दल बोलताना श्रीसंत याने एक खासगी कारण पुढे केले आहे. ‘मला धोनी आणि चेन्नई संघाबद्दल बिलकूल तिरस्कार वाटत नाही. मात्र, मला त्या संघाची जर्सी (टी-शर्ट) आवडत नाही. याचे कारण ती जर्सी पाहून मला ऑस्ट्रेलियाचा संघ आठवतो.’ असे श्रीसंत याने म्हटले आहे.
एस. श्रीसंत… भारताचा एक प्रतिभावान पण वादग्रस्त खेळाडू
भारताचा माजी क्रिकेटपटू म्हणून एस. श्रीसंत याने एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रीसंत केरळचे प्रतिनिधीत्व करायचा आणि आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. श्रीसंत एक यशस्वी क्रिकेटपटू असला तरी, तो तितकाच वादग्रस्तही ठरला आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सप्टेंबर २०१३ मध्ये बीसीसीआयने श्रीसंतवर कायमस्वरुपी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती.