2024 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चांगलं होतं. यावर्षी टीम इंडियानं 11 वर्षांचा दुष्काळ संपवून आयसीसी ट्रॉफी (टी20 विश्वचषक 2024) जिंकली. संघातील खेळाडूंसाठी हे वर्ष चढ-उतारांचं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सूर्यकुमार यादव भारतीय टी20 संघाचा कर्णधार झाला. चला तर मग जाणून घेऊया टीम इंडियाच्या सर्व स्टार खेळाडूंसाठी हे वर्ष कसं होतं.
रोहित शर्मा – भारतीय कर्णधार रोहित शर्मानं या वर्षात आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये 27 सामने खेळले. या सामन्यांच्या 37 डावांमध्ये त्यानं 33.29 च्या सरासरीनं 1132 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं 3 शतकं आणि 7 अर्धशतकं ठोकली. रोहितनं आपल्या नेतृत्वाखाली भारताला टी20 विश्वचषक जिंकवून दिला.
विराट कोहली – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली या वर्षात आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये 22 सामने खेळला आहे. या सामन्यांच्या 29 डावांत फलंदाजी करताना त्यानं 22.62 च्या सरासरीनं 611 धावा केल्या. या काळात त्यानं 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली. यापैकी कोहलीची टी20 विश्वचषकाच्या फायनलमधील अर्धशतकी खेळी सर्वात महत्त्वाची होती.
सूर्यकुमार यादव – सूर्यकुमार यादवला यावर्षी भारताच्या टी20 संघाचं कर्णधार बनवण्यात आलं. सूर्यानं 2024 मध्ये टीम इंडियासाठी आतापर्यंत 18 सामने खेळले. या सामन्यांच्या 17 डावांत फलंदाजी करताना त्यानं 26.81 च्या सरासरीनं 429 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं 4 अर्धशतकं झळकावली.
हार्दिक पांड्या – स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं 2024 मध्ये टीम इंडियासाठी आतापर्यंत 17 सामने खेळले. या सामन्यांच्या 14 डावांमध्ये फलंदाजी करताना हार्दिकनं 44.00 च्या सरासरीनं 352 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 1 अर्धशतकही आलं. याशिवाय हार्दिकनं 16 डावांमध्ये गोलंदाजी करताना 26.25 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याचा सर्वोत्तम आकडा 3/20 आहे.
जसप्रीत बुमराह – जसप्रीत बुमराहनं यावर्षी टीम इंडियासाठी आतापर्यंत 20 सामने खेळले. यामध्ये त्यानं 73 विकेट घेतल्या आहेत. तो 2024 मध्ये 50 कसोटी विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला. याशिवाय तो 2024 टी20 विश्वचषकाचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ देखील राहिला.
हेही वाचा –
रोहित शर्मानं घेतला स्मिथचा अद्भुत कॅच, व्हिडिओ पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही!
ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस
‘वन मॅन आर्मी’..! बुम-बुमचा पुन्हा एकदा पंजा, गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी