---Advertisement---

वडील शेतकरी, आईने शूज घेण्यासाठी विकले आपले दागिने; कोण आहे साकिब हुसैन? एसआरएचचा नवा ‘मॅचविनर’

On: मंगळवार, एप्रिल 14, 2026 11:01 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (१३ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबादने राजस्थान रॉयल्सला पहिला पराभवाचा धक्का दिला. हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने ५७ धावांनी बाजी मारली. हैद्राबादच्या या विजयात दोन नवख्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. त्यातील एक बिहारमधील गोपालगंजचा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज साकिब हुसैन.

साकिबने सोमवारी आयपीएलमध्ये पदार्पण करताना २४ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे तो या स्पर्धेच्या इतिहासात पदार्पणातच चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. तसेच तो पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्वनी कुमारसोबत संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहे. या यादीत अल्झारी जोसेफ पहिल्या स्थानावर असून त्याने १२ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. ऍड्र्यू टाय (५/१७), शोएब अख्तर (४/११) आणि केवॉन कूपर (४/२६) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.

साकिबबरोबर हैद्राबादकडून प्रफुल्ल हिंगे यानेही राजस्थानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. या वेगवान गोलंदाजाने ४ षटकात ३४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

आयपीएल २०२६ साठी साकिबला हैद्राबादने ३० लाख रुपयांना करारबद्ध केले. त्याला याआधी २०२४ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने करारबद्ध केले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच त्याला पुढच्या हंगामासाठी संघातून मुक्त केले गेले.

आयपीएलपर्यंत साकिबचा प्रवासही काही सोपा नव्हता. त्याचे वडील शेतकरी होते. जेव्हा त्यांचे उत्पन्न, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे नसायचे तेव्हा ते मजुरीचे कामही करत. जेव्हा साकिबची बिहारच्या रणजी संघात निवड झाली तेव्हा त्याच्याकडे शूजही नव्हते. तो अनेकदा फाटलेल्या शूजनेच खेळला आहे. त्यामुळे त्याच्या आईने आपले दागिने विकत त्याच्यासाठी शूज घेतले.

साकिबने २०२२-२३ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहारकडून टी२० पदार्पण केले. त्याने वयाच्या १७ व्या वर्षीच आपल्या दुसऱ्यात सामन्यात २० धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर त्याने २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ धावांत ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

आपल्या पहिल्याच आयपीएल स्पेलमध्ये ४ बळी घेणारे भारतीय खेळाडू
४/२४ – शादाब जकाती (सीएसके) विरुद्ध डीसी, जोहान्सबर्ग, २००९
४/२४ – अश्वनी कुमार (एमआय) विरुद्ध केकेआर, मुंबई वानखेडे स्टेडियम, २०२५
४/२४ – साकिब हुसैन (एसआरएच) विरुद्ध आरआर, हैदराबाद, २०२६
४/२९ – पॉल वाल्थाटी (पीबीकेएस) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, हैदराबाद, २०११
४/३४ – प्रफुल्ल हिंगे (एसआरएच) विरुद्ध आरआर, हैदराबाद, २०२६

आयपीएल पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी –
६/१२ – अल्झारी जोसेफ (एमआय) विरुद्ध एसआरएच, हैदराबाद, २०१९
५/१७ – अँड्र्यू टाय (जीएल) विरुद्ध आरपीएस, राजकोट, २०१७
४/११ – शोएब अख्तर (केकेआर) विरुद्ध डीसी, कोलकाता, २००८
४/२४ – अश्वनी कुमार (एमआय) विरुद्ध केकेआर, मुंबई वानखेडे स्टेडियम, २०२५
४/२४ – साकिब हुसैन (एसआरएच) विरुद्ध आरआर, हैदराबाद, २०२६
४/२६ – केवॉन कूपर (आरआर) विरुद्ध पीबीकेएस, जयपूर, २०१२
४/३३ – डेव्हिड विज (आरसीबी) विरुद्ध एमआय, बंगळुरू, २०१५
४/३४ – प्रफुल्ल हिंगे (एसआरएच) विरुद्ध आरआर, हैदराबाद, २०२६

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---