अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीगच्या इतिहासात शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पहिल्यांदाच असं घडत आहे की दोन सामने एकाच वेळी सुरु झाले होते. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ५५ वा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ५६ वा सामना एकाचवेळी सुरु झाला. हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबईने ४२ धावांनी विजय मिळवला. पण, त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद २३५ धावा केल्या आणि हैदराबादला २३६ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावे लागले. यासह हैदराबाद गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिले. तर, मुंबई पाचव्या क्रमांकावर राहिले.
हैदराबादने २६५ धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली होती. जेसन रॉय आणि अभिषेक शर्माने ६४ धावांची सलामी दिली. पण हे दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले असतानाच रॉय ६ व्या षटकात ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळताना ३४ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात जिमी निशामने अभिषेक शर्माला ३३ धावांवर बाद केले. यानंतर हैदराबादचा प्रभारी कर्णधार मनिष पांडेने एक बाजू लावून धरली होती. पण, दुसऱ्या बाजूने हैदराबादच्या फलंदाजांनी विकेट्स गमावल्या.
मोहम्मद नबीला ३ धावांवर पियुष चावलाने ९ व्या षटकात माघारी धाडले. तर, अब्दुल सामदला १० व्या षटकात निशामने ड्रेसिंग रुमचा रस्ता दाखवला. तो केवळ २ धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रियम गर्गने कर्णधाराची साथ देण्याचा प्रयत्न केला. त्याने मनिषसह अर्धशतकी भागीदारीही रचली. पण, त्याची खेळी जसप्रीत बुमराहने १६ व्या षटकात संपवली. तो २९ धावांवर बाद झाला. १७ व्या षटकात जेसन होल्डरला १ धावेवर नॅथन कुल्टर-नाईलने बाद केले.
यानंतर बुमराहने स्वत:च्याच चेंडूवर १८ व्या षटकात राशिद खानचा झेल घेत त्याला ९ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, मनिष पांडेने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. १९ व्या षटकात वृद्धिमान साहा देखील २ धावा करुन नॅथन कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर त्यालाच झेल देत माघारी परतला. अखेर हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावाच करता आल्या. कर्णधार मनिष ४१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावांवर नाबाद राहिला. सिद्धार्थ कौलने नाबाद १ धाव केली.
इशान-सूर्यकुमारचे वादळ
मुंबईकडून इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजी केली. इशान किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने चौकार षटकारांची बरसात करत १६ चेंडूत अर्धशतक केले. तो सर्वात जलद आयपीएल अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैनासह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत १४ चेंडूतील अर्धशतकासह केएल राहुल अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या सुनील नारायण आणि युसूफ पठाण आहेत. त्यांनी प्रत्येकी १५ चेंडूत अर्धशतक केले होते.
इशान एकाबाजूने फटकेबाजी करत असताना दुसरी बाजू रोहित शर्माने सांभाळली होती. पण रोहितला राशिद खानने ६ व्या षटकांत १८ धावांवर बाद केले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. पण मुंबईने पॉवर प्लेमध्ये ६ षटकांत १ बाद ८३ धावा केल्या.
रोहितनंतर ९ व्या षटकात हार्दिक पंड्याला १० धावांवर जेसन होल्डरने बाद केले. यानंतर इशान किशनचाही अडथळा उम्रान मलिकने १० व्या षटकात दूर केला. इशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारासंह ८४ धावा केल्या. त्यापाठोपाठ कायरन पोलार्ड १३ व्या षटकात अभिषेक शर्माचा शिकार ठरला. त्याने १३ धावा केल्या. त्याच्यापुढच्याच चेंडूवर अभिषेकने जिमी निशामला शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे मुंबईच्या धावगतीला थोडा लगाम लागला.
पण, दुसऱ्या बाजूने सूर्युकमारने पुन्हा आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानेही त्याचे वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पण, तो आक्रमक खेळत असताना समोरुन विकेट जात होत्या. कृणाल पंड्या १६ व्या षटकात ९ धावांवर राशिद खान विरुद्ध खेळताना बाद झाला. तर नॅथन कुल्टर नाईलला ३ धावांवर होल्डरने मोहम्मद नबीकडे झेल देण्यास भाग पाडले.
पण, सूर्युकमारने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. पण, तो आणि पियुष चावला अखेरच्या षटकात बाद झाले. त्यांना जेसन होल्डरने बाद केले. सूर्यकुमारने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या.
मनिष पांडे हैदराबादचा कर्णधार
या सामन्यासाठी मनिष पांडे सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे. संघाचा नियमित कर्णधार विलियम्सनच्या कोपराला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर भूवनेश्वर कुमारला देखील छोटी दुखापत आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जिमी निशाम, नॅथन कूल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.
सनरायझर्स हैदराबाद: जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनीष पांडे (कर्णधार), प्रियम गर्ग, अब्दुल समद, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद नबी, उम्रान मलिक, सिद्धार्थ कौल.






