श्रीलंकेचा फलंदाज कामिंदू मेंडिसनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताच सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यानं सुनील गावस्कर आणि डॉन ब्रॅडमन सारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीत श्रीलंकेच्या संघांची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. मात्र कामिंदू मेंडिस एका टोकावर ठाम उभा राहिला. त्यानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 74 धावांची शानदार खेळी केली. इंग्लंडच्या 427 धावांच्या प्रचंड धावसंख्येसमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 196 धावांत गारद झाला. आपल्या या खेळीत कामिंदू मेंडिसनं कसोटी क्रिकेटमध्ये एक खास कामगिरी केली आहे.
कमिंडू मेंडिस हा कारकिर्दीतील पहिल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये 600 हून अधिक धावा करणारा जगातील 7वा फलंदाज ठरला आहे. लॉर्ड्स कसोटीत त्याचा अजून एक डाव बाकी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 डावांमध्ये त्यानं 89.57 च्या सरासरीने 627 धावा केल्या आहेत.
कामिंडू मेंडिसच्या आधी अशी कामगिरी सुनील गावस्कर, जॉर्ज हॅडली, हॅरी ब्रूक, डेव्हॉन कॉनवे, कॉनरॅड हंट आणि डॉन ब्रॅडमन यांनी केली होती. पहिल्या 5 कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. ते पहिल्या 5 कसोटीत 800 धावांचा टप्पा पार करणारा जगातील एकमेव फलंदाज आहेत. त्यांच्याशिवाय आजपर्यंत अशी कामगिरी कोणताही फलंदाज करू शकलेला नाही.
कारकिर्दीतील पहिल्या 5 कसोटीमध्ये सर्वाधिक धावा
सुनील गावस्कर – 831
जॉर्ज हॅडली – 714
कामिंदू मेंडिस – 627 (एक डाव बाकी)*
हॅरी ब्रूक – 623
डेव्हॉन कॉनवे – 623
कॉनरॅड हंट – 622
डॉन ब्रॅडमन – 607
कामिंडू मेंडिसनं 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. पहिल्या सामन्यात त्यानं 61 धावा केल्या. यानंतर त्यानं बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात शतकं ठोकली. त्यानं तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद 92 धावा केल्या. कामिंडू मेंडिसचं तिसरे कसोटी शतक मँचेस्टरमध्ये आले, जेव्हा त्यानं इंग्लंडविरुद्ध 113 धावा केल्या.
हेही वाचा –
बांगलादेश मालिकेपूर्वी युवा फलंदाजाचं दमदार शतक, कसोटी संघासाठी ठोकला दावा
दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतर शाहीन आफ्रिदी शॉकमध्ये, पाकिस्तान संघात उभी फूट
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 10 गोलंदाज; यादीत फक्त दोनच भारतीय






