गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेनं न्यूझीलंडचा जोरदार पराभव केला. श्रीलंकेच्या संघानं हा सामना एक डाव आणि 154 धावांनी जिंकून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशआत घातली. अशाप्रकारे न्यूझीलंडला भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंकेत नाचक्कीला सामोरं जावं लागलं. आता टीम इंडियाविरुद्ध किवी संघाची अवस्था आणखी बिकट होऊ शकते.
श्रीलंकेनं दुसरी कसोटी अवघ्या चार दिवसांत जिंकली. यासह संघानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलकडे वाटचाल केली आहे. श्रीलंकेच्या कमिंदू मेंडिसला 182 धावांच्या नाबाद खेळीसाठी सामनावीर आणि तर मालिकेत 18 विकेट घेणाऱ्या प्रभात जयसूर्याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 88 धावांवर आटोपला होता, ज्यानंतर श्रीलंकेनं त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची कामगिरी चांगली झाली. परंतु संघाला सर्वोत्कृष्ट प्रयत्न करूनही केवळ 360 धावाच करता आल्या. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सनं सर्वाधिक 78 धावांची खेळी केली, तर मिचेल सँटनरनं 67 धावांचं योगदान दिलं. याशिवाय डेव्हन कॉनवेनं 61 आणि टॉम ब्लंडेलनं 60 धावा केल्या. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेचा नवोदित फिरकी गोलंदाज निशान पेरिसनं धुमाकूळ घातला. त्यानं 6 बळी घेतले. प्रभात जयसूर्याला 3 बळी मिळाले.
सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत 5 गडी बाद 602 धावा करून डाव घोषित केला होता. श्रीलंकेकडून कामिंडू मेंडिसनं सर्वाधिक नाबाद 182 धावांची खेळी केली, तर दिनेश चंडिमलनं 116 आणि कुसल मेंडिसनं नाबाद 106 धावा केल्या. या प्रचंड धावसंख्येसमोर न्यूझीलंडची अवस्था खूपच खराब झाली.
याआधी, गॅलेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही न्यूझीलंडचा पराभव झाला होता. या सामन्यात श्रीलंकेनं 63 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता श्रीलंकेनं दुसरा सामनाही जिंकत मालिकेत क्लिन स्वीप केला. यासह त्यांनी तब्बल 15 वर्षांनंतर न्यूझीलंडला कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे.
हेही वाचा –
कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया, सामन्याची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल
केवळ धोनीच नाही, तर या दोन दिग्गजांनाही ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करता येईल; जाणून घ्या
आयपीएल 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी कधी जाहीर होणार? तारीख जाणून घ्या