क्रिकेट विश्वात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मुद्दा चांगलाच तापला आहे. विशेषत: भारतानं पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीपुढे मोठी समस्या उभी राहिली आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयनं आपला संघ पाकिस्तानात पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. यानंतर आयसीसीनं वेळापत्रकाशी संबंधित कार्यक्रम रद्द केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाले. जर पाकिस्ताननंही हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला आणि भारतावर स्पर्धेतून माघार घेण्याची परिस्थिती उद्भवली, तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची जागा कोणता संघ घेऊ शकतो? हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या आठ आवृत्त्यांमध्ये क्रमवारीत पहिल्या आठ स्थानांवर असलेले संघ पात्र ठरले होते. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं स्वरूप वेगळं आहे. येथे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या टेबलमध्ये टॉप-8 मध्ये असलेले आठ संघ पात्र ठरले. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे ते आठ संघ आहेत, ज्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये थेट प्रवेश मिळाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आठ संघ विश्वचषक स्पर्धेतील गुणतालिकेच्या आधारे निश्चित करण्यात आले. त्यामुळे टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग न घेतल्यास त्यांची जागा श्रीलंकेला दिली जाईल. एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत श्रीलंकेची टीम नवव्या स्थानावर राहिली होती.
क्रिकेटमधील भारतीय बाजारपेठेचा विचार करता, टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग न घेतल्यास आयसीसीला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. यामुळे हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याचा विषयही चर्चेत आहे. मात्र वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही आपला हट्ट सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत काय निर्णय घेते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा –
4 क्रिकेटपटू जे यावर्षी पिता बनले, लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश
केएल राहुलला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता का दाखवला जाऊ शकतो? तीन प्रमुख कारणं जाणून घ्या
हेड कोच गौतम गंभीर विरुद्ध कट केला जातोय? माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ