आगामी टी २० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकाला १७ ऑक्टोंबरपासून सुरुवात होईल. विश्वचषकासाठी सहभागी होणाऱ्या सर्व देशांनी त्यांच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. आयसीसीच्या नियमांप्रमाणे १० ऑक्टोंबरपर्यंत या संघात बदल करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. अशात श्रीलंकेने त्यांच्या संघात एक बदल केला असून, पाच अतिरिक्त खेळाडूंना सामील केले आहे. श्रीलंकन संघ ३ ऑक्टोंबरला विश्वचषकासाठी ओमानला रवाना होणार आहे.
या पाच खेळाडूंची राखीव म्हणून निवड
श्रीलंकेने त्याच्या टी२० विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या संघात पथुम निशंका, मिनोद भानुका, अशेन बंडारा, लक्षन संदकन आणि रमेश मेंडिस या पाच खेळाडूंना नव्याने सामील केले आहे. तसेच यापूर्वी १५ सदस्यीय संघात निवडला गेलेल्या लाहिरू मदुशंकाला त्याच्या फिटनेसच्या कारणास्तव संघातुन बाहेर केले गेले आहे. श्रीलंकेचे खेळ मंत्री नमल राजपक्षेंंच्या परवानगीने संघात या पाच खेळाडूंना जोडले गेले. नव्याने जोडल्या गेलेल्या पाच खेळाडूंमुळे विश्वचषकासाठी श्रीलंकन संघात एकूण २३ खेळाडू असणार आहेत. संघ क्वालिफायरमध्ये विजय मिळवून सुपर १२ मध्ये स्थान बनवण्याचा प्रयत्न करेल.
टी२० विश्वचषकामध्ये श्रीलंकन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दसुन शनाकावर असणार आहे. तसेच, संघाचे उपकर्णधारपद धनंजय डिसिल्वा सांभाळेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डने १२ सप्टेंबरला विश्वचषकासाठी त्यांच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. तसेच संघासोबत चार राखीव खेळाडूही होते. श्रीलंका विश्वचषकातील त्याचा पहिला सामना नामिबियाविरुद्ध १८ सप्टेंबरला खेळणार आहे.
श्रीलंकेचा टी२० विश्वचषकासाठी निवडलेला संघ :
दसुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उपकर्णधार), कुसल जनीथ परेरा, दिनेश चांदीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चरित असलंका, वानिंदु हसरंगा, कामिंडु मेंडिस, चमिका करुणारत्ने, नुवान प्रदीप, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रेमा, महेश दीक्षाना.
राखीव खेळाडू : लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजय, पुलिना थरंगा
अतिरिक्त ५ खेळाडू : पथुम निशंका, मिनोद भानुका, अशेन बंडारा, लक्षण संदाकन, रमेश मेंडिस।