कोलंबो । श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी कसोटीपटू ग्रॅमी लॅबरूय यांना निवड समिती अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तान बरोबर सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवड समितीवर ग्रॅमी लॅबरूय यांची निवड माजी महान खेळाडू सनथ जयसूर्या यांनी राजीनामा दिल्यावर करण्यात आली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० असा पराभव झाल्यावर सनथ जयसूर्याने निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर श्रीलंका दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिका देखील पराभूत झाली होती.
” नवीन निवड समिती ही त्यांचा संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी निवडतील. युनाइटेड अरब अमिरातमध्ये होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी ही संघ निवड असेल. ” असे श्रीलंका बोर्डाने प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.
श्रीलंका या दौऱ्यात २ कसोटी, ५वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.
५३ वर्षीय ग्रॅमी लॅबरूय यांनी श्रीलंकेकडून ९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी २७ बळी मिळवले आहेत. तर ४४वनडे सामन्यात ४५ बळी घेतले आहेत.
५ सदस्यांच्या या समितीमध्ये गामिनी विक्रेमसिंघे, जेरील वोटर्सज, साजिथ फर्नांडो आणि आशंका गुरुसिंह यांचा समावेश आहे.