आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आता सुपर-८चे सामने सुरू होणार आहेत. या स्पर्धेचे दोन्ही यजमान संघ भारत आणि श्रीलंका स्पर्धेच्या पुढील फेरीत दाखल झाले आहेत. या स्पर्धेआधी श्रीलंकेला खूपच कमकुवत संघ मानले जात होते, मात्र काही खेळांडूनी धमाकेदार कामगिरी करत संघाला सुपर-८मध्ये पोहोचण्यास मदत केली. यामागे श्रीलंकेच्या एका फलंदाजाची मोठी भुमिका राहिली आहे. पथुम निसांकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कठीण आणि महत्वाच्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पथुमने शतकी खेळी केली. यामुळे तो टी२० विश्वचषकात श्रीलंकेकडून शतक करणारा दुसराच फलंदाज ठरला. टी२० प्रकारच नाही तर वनडेमध्येही त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. त्याच्या नावावर वनडेमध्ये द्विशतक आहे. यामुळे त्याला ‘श्रीलंकेचा रनमशीन’ म्हटले जाऊ लागले. २७ वर्षाच्या या खेळाडूचा हा प्रवास काही सोपा नव्हता. गरिबीची स्थिती असणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पथुमने कठोर मेहनत करत पूर्ण केले.
निसांकाचे वडिल सुनील हे गॉलमध्ये ग्राउंड बॉय म्हणजे मैदानाच्या देखभालीचे काम करत. त्यांची आर्थिक स्थिती खूपच वाईट होती. त्यांचा घरखर्चही पूर्ण होत नसल्याने त्याची आई कलूतारा मंदिराबाहेर फुलविक्रेत्याचे काम करत होत्या. कोणत्याही हवामानाचा विचार न करत पथुमचा क्रिकेट सरावाचा खर्च व्हावा यासाठी त्याच्या दोन्ही पालकांनी मेहनत घेतली. त्याचेच फळ म्हणून तो आता राष्ट्रीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे.
पथुमने २०२१मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १८ कसोटी, ७७ वनडे आणि ८७ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीमध्ये ४ शतके आणि ७ अर्धशतकासह १३०५ धावा केल्या. त्यामध्ये १८७ त्याची सर्वोच्च खेळी ठरली. ही खेळी त्याने २०२५मध्ये बांग्लादेशविरुद्ध गॉल स्टेडियमवर केली होती. वनडेमध्ये ७ शतक आणि १८ अर्धशतकांच्या साहाय्याने २९२० धावा केल्या आहेत. यामधील नाबाद २१० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून अफगाणिस्तानविरुद्ध केले आहे.
पथुमने आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही २ शतके केली आहेत. यामध्ये त्याने १८ अर्धशतकांसह २५७४ धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध ८ खेळाडूंनी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ खेळाडूंनी टी२०मध्ये शतके केली आहेत, मात्र या दोन्ही संघांविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये शतक करणारा पथुम हा एकमेव खेळाडू आहे.






