मुंबई । पुढील वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ ठरला तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला ‘बॅकअप’ म्हणून ठेवले आहे. या स्पर्धेसाठी अजून एक वर्ष बाकी आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी 20 विश्वचषक कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
काही माध्यमातील वृत्तांनुसार, कोरोना साथीमुळे जर स्पर्धा भारतात झाली नाही तर श्रीलंका आणि युएईला पुरुष टी -20 विश्वचषक 2021 मध्ये बॅकअप वेन्यू म्हणून ठेवले गेले आहे. आयसीसीने गेल्या आठवड्यात जाहिर केले की, टी 20 विश्वचषक भारतात 2021 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2022 मध्ये होईल.
कोणत्याही जागतिक स्पर्धेत बॅक अपसाठी एक मानक प्रोटोकॉल असतो. या अहवालानुसार, प्रत्येक आयसीसी स्पर्धेसाठी बॅक-लाइनचा निर्णय प्रमाणित प्रोटोकॉलनुसार घेण्यात आला आहे. परंतु या वेळी कोरोना साथीच्या दृष्टीने त्याचे अतिरिक्त महत्त्व आहे.
वृत्तात म्हटले आहे की, ‘कोरोना साथीची लागण होण्यात भारत जगात तिसर्या क्रमांकाचा देश आहे. आतापर्यंत वीस लाखाहून अधिक प्रकरणे झाली आहेत आणि 45 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता आयपीएल युएईमध्येच घ्यावी लागत आहे. तसेच देशांतर्गत हंगामासाठीही तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला आहे.या स्पर्धाला बराच वेळ असल्याने भारतीय क्रिकेट बोर्डातील कोणताही अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाही.’