भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिला सामना भारताने ३०४ धावांनी जिंकला. मालिकेला सुरवात झाल्यापासून श्रीलंका आणि भारतीय संघात दुखापत ग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. भारतीय संघात के.एल राहुल, मुरली विजय खेळू शकले नाहीत तर श्रीलंका संघात सुरंगा लकमल, दिनेश चंडिमल यांना बाहेर बसावे लागले.
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेचे दोन फलंदाज, रंगना हेराथ आणि असेला गुणरत्ने फलंदाजीला आलेच नाहीत आणि सामना भारताच्या नावे झाला. गुणरत्नेला क्षेत्ररक्षण करताना बोटाला दुखापत झाल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले होते तसेच हेराथला पण बोटाच्या दुखापतीमुळे फलंदाजी करता आली नाही.
चिंतेची बाब ही आहे की हेराथ अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्याला उपलब्ध होतो का नाही हे पहावे लागेल. बोटाच्या दुखापतीमुळे असेला गुणरत्नेला मालिकेतून बाहेर पडावे लागले. सुरंगा लकमलला पाठीच्या दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना मुकावा लागला होता मात्र त्याला आता कोलंबोचा दुसरा कसोटी सामनाही खेळता येणार नसल्याचे समजते.
दिनेश चंडिमल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचेही समजते आहे. आता नक्की संघात कोण स्थान मिळवते व दुखापतीमुळे कोणाला बाहेर बसावे लागते हे सामन्यादिवशी पहावे लागेल.