कोलंबो| श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी२० सामना प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी विसरण्याजोगा राहिला. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला केवळ ८२ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने १५ व्या षटकातच ७ विकेट्स राखून सामना जिंकला आणि २-१ ने टी२० मालिकाही खिशात घातली. श्रीलंकेच्या वांनेदू हसरंगा याने अष्टपैलू कामगिरी करत टी२० मालिका विजयात खारीचा वाटा उचलला. पण मालिका विजयाचा आनंद मात्र त्याला अनावर झाला आणि त्याने स्वत:वरील ताबा गमावला.
तर घडले असे की, भारताच्या ८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धनंजय डी सिल्वा आणि हसरंगा यांनी १५ व्या षटकातच सामना जिंकला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने पंधराव्या षटकातील चौथा चेंडू वाईड टाकला आणि श्रीलंकेने जास्तीची एक धाव मिळाली व त्यांनी सामना खिशात घातला. बलाढ्य अशा भारतीय संघाला अगदी सहजतेने पराभूत केल्याने इतर श्रीलंकन खेळाडूंसह हसरंगालाही अति आनंद झाला.
मेदानातून बाहेर गेल्यानंतर हातातील पाण्याची बॉटल जोराने जमिनीवर आदळत त्याने जल्लोष साजरा केला. मोठमोठ्याने ओरडत तो अतिशय आक्रमक झाल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. त्याचा हा व्हिडिओ श्रीलंकेच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. परंतु काहींना त्याची ही जल्लोष साजरा करण्याची पद्धत पटलेली नाही. अशाप्रकारे जमिनीवर बॉटल आदळत जल्लोष करणे लाजिरवाणे असल्याचे म्हणत काहींनी त्याच्यावर टीका केली आहे.
https://www.facebook.com/watch/?v=845675096311596
दरम्यान या निर्णायक सामन्यात भारतीय खेळाडू साजेशे प्रदर्शन करू शकले नाहीत. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार धवन चमिराच्या गोलंदाजीवर सिल्वाच्या हाती झेल देत शून्यावर बाद झाला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडही केवळ १४ धावा करु शकला. कुलदीप यादवने शेवटपर्यंत नाबाद राहत सर्वाधिक २३ धावांची खेळी केली. तसेच भुवनेश्वर कुमारनेही १६ धावांचे योगदान देत संघाला ८१ धावांपर्यंत पोहोचवले. श्रीलंकेकडून हसरंगाने सर्वाधिक ४ विकेट्स चटकावल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अविष्का फर्नांडोने १२ आणि मिनोद भानुकाने १८ धावा जोडल्या. तसेच धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक नाबाद २३ व हसंरगाने नाबाद १४ धावा करत सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या तिशीत वॉरियरच्या डोक्यावर सजली ‘पदार्पणाची कॅप’; आनंदाने झाला भावूक, फुटलं रडू
कमालच! श्रीलंका दौऱ्यात वनडे अन् टी२० पदार्पण केलेल्या खेळाडूंचा तयार होऊ शकतो आख्खा एक भारतीय संघ
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची झाली सांगता; पाहा कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा अन् विकेट्स