ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन संघात टी-२० विश्वचषकातील २२ वा सामना गुरुवारी (२८ ऑक्टोबर) पार पडला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स राखून श्रीलंकेवर सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली आणि संघाच्या विजयात त्याची महत्वपूर्ण भूमिका राहीली.
असे असले तरी, श्रीलंकेला वॉर्नरला बाद करण्याची एक मोठी संधी मिळाली होती. यष्टीरक्षक कुशल परेराने जर ती संधी गमावली नसती, तर सामन्याच्या निकालाचे चित्र वेगळे असू शकले असते.
डेविड वार्नरने या सामन्यात ४२ चेंडूत ६५ धावांची महत्वाची खेळी केली आणि संघाला एक चांगली सुरुवत करून दिली. त्याने या धावा १० चौकारांच्या मदतीने आणि १५४.७६ च्या स्ट्रइक रेटने केल्या. मात्र, कुशल परेराला वॉर्नरला १८ धावांवर बाद करण्याची संधी मिळाली होती. पण कुशल परेराला त्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि एक सोपा झेल त्याने सोडला.
झाले असे की, सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावात श्रीलंकेचा दुष्मंथा चमीरा ५ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकातील चौथा चेंडू शॉर्ट टाकला आणि वॉर्नरच्या खांद्याला लक्ष केले. त्याने टाकलेला हा चेंडू खेळताना वॉर्नरकडून एक चूक झाली. वॉर्नरने हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटवर व्यवस्थित आला नाही आणि ग्लव्ह्जवर लागून स्टंपच्या मागे हवेत उडाला. यावेळी यष्टीरक्षक परेराकडे वॉर्नरचा झेल घेण्यासाठी एक चांगली संधी होती, पण तो हा झेल घेऊ शकला नाही.
https://www.instagram.com/reel/CVlC1dKlGuY
वॉर्रनचा हा झेल सुटल्यामुळे श्रीलंका संघातील सर्वच खेळाडू निराश झालेले दिसले. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच वॉर्नरनेही त्याला मिळालेल्या या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेतल्याचे दिसले. जीवनदान मिळाल्यानंतर वॉर्नरने जी खेळी केली, त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात १८ चेंडू शिल्लक ठेऊन सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
इट का जवाब पत्थर से! षटकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टार्कने परेराला केलं ‘क्लीन बोल्ड’