मुंबई । श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा याने २०११ साली झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात दोनदा नाणेफेक का झाली याचा खुलासा नऊ वर्षांनंतर केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय मिळवत अठ्ठावीस वर्षांनंतर विश्वचषकाचा किताब जिंकला होता.
कुमार संगकाराने आर. अश्विनसोबत इन्स्टाग्राम लाइव्हवर बोलताना सांगितले की, वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. श्रीलंकेत असे कधीच झाले नव्हते. यापूर्वी कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर आशीच प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली होती. यष्टीरक्षण करत असताना स्लिपमध्ये थांबलेला खेळाडूंचा देखील आवाज येत नव्हता, इतकी गर्दी स्टेडियममध्ये होती .
या गोंगाटामुळे नाणेफेकीच्या वेळी गडबड झाली. नाणेफेक वेळी मी हेड म्हणाला होतो. पण धोनीला ते ऐकू गेले नाही. त्यामुळे त्याने विचारले की तू टेल म्हणालास का? वास्तविक पाहता मॅच रेफ्रीने देखील सांगितले की नाणेफेक मीच जिंकलो होतो. मी काय बोललो हे धोनीला ऐकू न गेल्याने धोनीने पुन्हा एकदा टॉस करण्यास सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा नाणेफेक झाली सुदैवाने मी पुन्हा नाणेफेक जिंकलो आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने जरी नाणेफेक जिंकली असती तर त्यांनी फलंदाजीच घेतली असती.
संगकारा पुढे बोलताना म्हणाला की, या सामन्यात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज स्नायू रोखल्यामुळे खेळू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो अंतिम सामना खेळणार नसल्याने पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचा खेळाडूचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.