आशिया चषक 2022 मधील पाचवा सामना श्रीलंका व बांगलादेश या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला. सुपर फोरच्यादृष्टीने ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत 2 गड्यांनी सामना आपल्या नावे केला. ब गटातून आता अफगाणिस्तानसह श्रीलंका सुपर फोरमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. तर, बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
Sri Lanka are through to the Super Four phase of #AsiaCup2022 after winning a nail-biter 👏#SLvBAN | #AsiaCup2022 | 📝 Scorecard: https://t.co/pxH6nCOZsp pic.twitter.com/wTDsPa4Yju
— ICC (@ICC) September 1, 2022
श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकत बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, त्याचा हा निर्णय बांगलादेशने उलटवला. अष्टपैलू मेहदी मिराज याला सलामीला पाठवत त्यांनी आक्रमण केले. शब्बीर रहमान लवकर बाद झाला तरी, मिराजने आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पार पाडत 26 चेंडूत 38 धावा केल्या. शाकिबही 24 काढून बाद झाला. उपकर्णधर अफिफ हुसेनने 22 चेंडूवर आक्रमक 39 धावा चोपल्या. महमदुल्लाने 27 धावांची संथ मात्र महत्त्वपूर्ण खेळी केली. मागील सामन्यात चमकलेल्या मोसद्देक हुसेन याने पुन्हा एकदा आक्रमक खेळ दाखवत 9 चेंडूमध्ये 24 धावा करत संघाला 183 धावांपर्यंत पोहचविले.
प्रत्युत्तरात, श्रीलंकेला निसंका व कुसल मेंडीस यांनी 45 धावांची सलामी दिली. मात्र, मधल्या फळीत असलंका, गुणतिलका आणि राजपक्षे अपयशी ठरले. कुसल मेंडीसने एक बाजू लावून धरत अर्धशतक साजरे करत श्रीलंकेच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर कर्णधार दसु़न शनाकाने जबाबदारी खांद्यावर घेत आक्रमक 45 धावा चोपल्या. मात्र, तो ऐनवेळी बाद झाला. करूणारत्नेने महत्त्वाच्या 16 व पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज फर्नांडो याने अखेरीस नाबाद 10 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या कुसल मेंडीस याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.