आज झिम्बाब्वे श्रीलंकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळवळा जाणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर.प्रेमदासा स्टेडियम वर खेळवला जाईल. श्रीलंकेतील सत्राची ही सुरुवात असून या महिन्याअखेरीस त्यांचा मुकाबला हा भारताशी असेल. श्रीलंका-भारत एकमेकांशी ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ २०-षटकांचा सामना खेळतील.
सर्वसाधारण परिस्थितीत श्रीलंकेसाठी हा कसोटी सामना म्हणजे केवळ एक सराव सामना ठरला असता. पण गेल्या आठवड्यात त्यांचा झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत केलेला पराभव श्रीलंकेला बराच काळ विसरता येणार नाही. हा जिव्हारी लागलेला पराभव अँजेलो मॅथ्युसच्या कर्णधारपदावरून झालेल्या हकालपट्टीवरून दिसून येतो.
नवीन कर्णधार दिनेश चंडिमलची ही नक्कीच ‘कसोटी’ असणार आहे. एकदिवसीय सामन्यात चंडिमलला श्रीलंकन निवड समितीने जागा दिली नव्हती, त्यामुळे धावा बनवून स्वतःची निवड सार्थ करून दाखवावी लागणार आहे.अर्थात रंगना हेरथ सारखा मजबूत दुर्ग त्यांच्याकडे आहे. मुरलीधरनच्या निवृत्तीनंतर त्याने कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत (२८९ बळी). मागच्या वर्षी झिम्बाब्वेत झालेल्या २ कसोटी सामन्यात १९ बळी एकट्या हेरथने घेतले होते. उपूल थरांगा, कुसल मेंडिस सारखे चांगले फलंदाज श्रीलंकेच्या संघात आहेत.
ऐतिहासिक एकदिवसीय मालिका विजयानंतर झिम्बाब्वेचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार. तरीही श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत खेळणं हे सोपं काम नाही. श्रीलंकेचे २० बळी मिळवणं हे झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना मोठ आव्हान असणार आहे. झिम्बाब्वेच्या फलंदाजांची चांगलीच परीक्षा होईल, कारण हॅमिल्टन मसाकडजा सोडून यापैकी कोणीही आधी श्रीलंकेत कसोटी सामना खेळलेला नाहीये. त्यामुळे एकदिवसीय मालिका विजयाचा अनुभव त्यांना पुरेपूर वापरावा लागेल.
मालिकेशी निगडित काही आकडेवारी:
*२०१४ पासून झिम्बाब्वे केवळ ९ कसोटी सामने खेळले आहेत.
*झिम्बाब्वे त्यांचा श्रीलंकेतील शेवटचा कसोटी सामना जानेवारी २००२ मध्ये खेळले.
*श्रीलंका हा एकमेव आशियाई देश आहे ज्याविरुद्ध झिम्बाब्वेला कधीही विजय मिळवता आला नाहीये. झिम्बाब्वेने भारत,पाकिस्तान आणि बांगलादेश या सर्वाना कसोटी सामन्यात हरवले आहे.
*दिनेश चंडिमल हा श्रीलंकेचा १५वा कसोटी कर्णधार होईल.
ओंकार मानकामे (टीम महा स्पोर्ट्स)