पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अॅग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित स्पर्धा २ जानेवारीपासून
पुणे । पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अॅग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सृजन करंडक राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ ते ६ जानेवारी २०१९ दरम्यान पुण्यातील भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड केली जाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजन समितीचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव आणि स्पर्धेचे व्यवस्थापक मदन वाणी, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर, अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मदन वाणी म्हणाले, मुले आणि मुलींच्या गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत २८ जिल्हा संघातील ४५० स्पर्धक सहभागी होतील. मुलांच्या आणि मुलींच्या प्रत्येकी १० वजनी गटात ही स्पर्धा होईल. यात मुलींचे वजनी गट ४८, ५१, ५४, ५७, ६०, ६४, ६९, ७५, ८१ आणि ८१ किलोपेक्षा अधिक असे असतील, तर मुलांचे वजनी गट ४९, ५२, ५६, ६०, ६४, ६९, ७५, ८१, ९१ आणि ९१ किलोपेक्षा अधिक असे असतील.
पुढे बोलताना मदन वाणी म्हणाले, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत आकाश गुरखा, मुअज्जम शेख, राष्ट्रीय खेळाडू उमैरा शेख, योगिता परदेशी, आर्या कुलकर्णी ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना सांघिक आणि वैयक्तिक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. बेस्ट बॉक्सर, मोस्ट चॅलेंजिंग बॉक्सर, मोस्ट प्रॉमेसिंग बॉक्सर यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे. दररोज दुपारी ४ ते ९ यावेळेत सामने होतील. दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
–मयांक अगरवाल काही ऐकेना! केएल राहुलही आला टेन्शनमध्ये
–कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत
–रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम