कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी 6 ऑक्टोबर रोजी गयाना ॲमेझॉन वॉरियर्स आणि सेंट लुसिया किंग्ज यांच्यात खेळला गेला. हा सामना सेंट लुसिया किंग्सनं जिंकत विजेतेपदावर कब्जा केला. विशेष म्हणजे, संघ प्रथमच सीपीएलचा चॅम्पियन बनला आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील सेंट लुसिया किंग्जनं इम्रान ताहिरच्या नेतृत्वाखालील गयाना संघाचा 6 गडी राखून पराभव केला. 45 वर्षीय इम्रान ताहिर 2023 मध्ये संघाला आपल्या नेतृत्वात विजेतेपद पटकावून दिलं होतं. त्यावेळी तो टी20 स्पर्धा जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर कर्णधार बनला होता. मात्र यंदा तो याची पुनरावृत्ती करू शकला नाही.
या सामन्यात सेंट लुसियाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून गयाना ॲमेझॉन वॉरियर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गयाना संघानं 20 षटकात 8 गडी गमावून 138 धावा केल्या होत्या. संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूला सुरुवात मिळाली, पण कोणीही मोठी खेळी करू शकलं नाही. संघाकडून डवान प्रिटोरियसनं सर्वाधिक 25 धावा केल्या. तर शाई होपच्या बॅटमधून 22 धावा आल्या. सेंट लुसियाकडून नूर अहमदनं 3 बळी घेतले. संघाच्या उर्वरित पाच खेळाडूंना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट लुसिया संघांची सुरुवात चांगली झाली. मात्र नंतर 51 धावांवर त्यांच्या चार विकेट पडल्या. यानंतर ॲरॉन जोन्स आणि रोस्टन चेस यांनी 88 धावांची नाबाद भागीदारी करत सामना 19व्या षटकात जिंकवून दिला. ॲरॉन जोन्स 48 धावा करून नाबाद परतला तर रोस्टन चेसनं नाबाद 39 धावा केल्या. कर्णधार डू प्लेसिसनं 21 धावांची खेळी केली. गयानच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. फायनलमध्ये कर्णधार इम्रान ताहिरला एकही विकेट मिळाली नाही. तो किफायतशीर ठरला, परंतु संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
हेही वाचा –
पहिला ओव्हर मेडन, दुसऱ्यामध्ये विकेट! मयंक यादवनं पदार्पणातच केलं भल्या-भल्यांना गार!
‘सिक्सर किंग’ सूर्या! जोस बटलरला टाकलं मागे, आता रोहितचा रेकॉर्ड निशाण्यावर
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या नावे अनेक विक्रम! पॉवरप्लेमध्ये मोठा पराक्रम