इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. युएईमध्ये रंगणाऱ्या या हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू समीत पटेल हा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येणार आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन टी-२० विश्वचषकापुर्वी २८ ऑगस्टपासून होणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना १९ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू समीत पटेल हा बारबाडोस ट्राइडेंट्स या संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलसह शाकिब अल हसन, फाफ डू प्लेसिस आणि ख्रिस मॉरिस सारखे स्टार खेळाडूदेखील सहभाग घेणार आहेत.
कॅरेबियन स्पर्धेत खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू
समीत पटेल याने २०१२ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पटेलने ६२ धावांची तुफानी खेळी केली होती. यासोबतच कर्णधार उन्मुक्त चंदसोबत मिळून शतकी भागीदारी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
समीतने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बडोदा, गुजरात आणि त्रिपुरा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी झालेल्या सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेत त्याने बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण २८ सामन्यात ७०८ धावा केल्या आहेत.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत १०१ खेळाडू घेणार सहभाग
कॅरेबियन प्रीमियर लील २०२१ स्पर्धेत एकूण ३३ सामने खेळले जाणार आहेत. या सर्व सामने सेंट किट्स अँड नेविसच्या वॉर्नर पार्कवर खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभाग घेणार असून १०१ खेळाडू मैदानात खेळताना दिसणार आहेत. यासोबतच पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज, मोहम्मद आमिर देखील पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे.
बारबाडोस ट्राइडेंट्स: ख्रिस मॉरिस, जेसन होल्डर, थिसारा परेरा, मोहम्मद आमिर, जॉनसन चार्ल्स, शाई होप, ओशेन थॉमस, काइल मेयर्स, हेडन वॉल्श जूनियर, आजम खान, रेमन रिफर, जस्टिन ग्रीव्स, एशले नर्स, शफीकुल्लाह गाफरी, नईम यंग, जोशुआ बिशप, समित पटेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची न्यूझीलंडविरुद्ध चिंताजनक आकडेवारी, WTC फायनलमध्ये अवघड होणार!
दिल्ली कॅपिटल्सला गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचवणाऱ्या रिषभचे नेतृत्त्वपद धोक्यात!
हौसेला मोल नाही! लेकाच्या क्रिकेट प्रेमासाठी बापाने ५ एकर शेत उपसलं अन् दर्जेदार मैदान बनवलं