स्टार इंडिया पुन्हा एका क्रिकेटमुळे चर्चेत आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या प्रसाराचे हक्क त्यांनी मिळवले, त्यासोबतच आता न्यूझीलंड क्रिकेट प्रसाराचे हक्क देखील आता स्टारला मिळाले आहेत.
एप्रिल २०२० पर्यंत डिजिटल आणि प्रक्षेपणाचे असे दोन्ही हक्क स्टारने पटकावले आहेत. या कालावधीत न्यूझीलंडमध्ये महिला आणि पुरुष यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या सर्व आंतराष्ट्रीय सामन्यांचे प्रसारण आशिया आणि आग्नेय आशिया (साऊथ इस्ट आशिया) खंडात करण्याचे हक्क स्टारला दिले आहेत.
भारतीय संघ या कालावधी दरम्यान न्यूझीलंडमध्ये एकूण ३ कसोटी, १० वनडे, आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या करारानंतर स्टार स्पोर्ट्सवर सर्वप्रथम प्रसारित होणारी क्रिकेट मालिका आहे न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज जी १ डिसेंबर २०१७ पासून सुरु होणार आहे.
त्याच बरोबर या कालावधीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी मालिका देखील रंगणार आहे.